ठाणे : लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे निवडून आले आहेत. पक्षफुटी नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणे पसंत केले तर आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण आधीच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्या कामाची पोलखोल करणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर नजिब मुल्ला यांनी मनसेवर देखील यावेळी टीका केली. तर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही खुशाल पोलखोल करा असे आव्हानच मुला आणि परांजपे यांना दिले. 


आव्हाडांनी केवळ आश्वासनं दिली


राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी महायुती सरकारने 50 कोटी रुपये विविध विकासकामांसाठी दिल्याचे सांगितलं. याआधी आव्हाडांनी केवळ आश्वासनेच दिली, मात्र कामं केली नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला. या सगळ्याची पोलखोल करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार येथून निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.


मनसेला नेहमीच विरोध राहील 


गेले पंधरा वर्षे मी आव्हाडांबरोबर काम करत आहे, मात्र त्यांनी आम्हाला केवळ आश्वासनेच दिली आणि आम्ही त्याला फसत गेलो. जेव्हा त्यांच्या पापाचा घडा भरला त्यावेळी आम्ही तिथून बाहेर पडलो असं नजिब मुल्ला म्हणाले. मनसे हा आमचा घटकपक्ष नाही, ते कायमच अल्पसंख्यांकावर बोलत असतात आणि माझा कायम त्याला विरोधच असेल अशी भूमिका नजीब मुल्ला यांनी मांडली.


दुसरीकडे, मी कोणालाही घाबरत नाही, कोणी काय केले याच्या सगळ्या किल्ल्या माझ्याकडेदेखील आहेत असा इशाला जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मी असे घाणेरडे राजकारण करत नाही, मात्र कोणालाही पोलखोल करायची असेल तर त्यांनी जरूर पोलखोल करावी, मी कोणाच्या बापाला ही घाबरत नसल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकांच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे.


ही बातमी वाचा: