CM, DCM Meeting At Varsha Bungalow : मुंबई : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), अजित पवार ((Deputy CM Ajit Pawar) यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. साधारण दीड तास झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही (Cabinet Expansion) चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक होत सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, त्याला महायुती म्हणून कसं सामोरे जायचं यावर रणनीती आखण्यात आली.
महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील रात्री उशीरा चाललेली ही पहिली बैठक नाही. यापूर्वीही अशा दोन बैठका वर्षा बंगल्यावर झालेल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत तब्बल दीड तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.
महायुतीची रात्री उशीरापर्यंत बैठक, नेमकं शिजतंय काय?
विधान परिषद निवडणूक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुतीतील अनेक मोठी नावं इच्छुक आहेत. त्यामुळे आता संधी कोणाला द्यायची? आणि त्यानंतर इतरांची नाराजी दूर कशी करायची? हा मोठा प्रश्न असणार आहे. या अनुषंगानं रात्रीच्या बैठकीत चर्चा झालेली असू शकते, असं बोललं जात आहे.
विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे कुठेतरी खोटा नरेटिव्ह मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचं महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. त्या दृष्टीनंही बैठकीत खलबतं झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत.
आगामी विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठ्या बदलांची शक्यता?
महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमधील सुमार कामगिरीची दखल दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी घेतली असून आता महाराष्ट्रातील घडामोडींवर दिल्लीतून विशेष लक्ष ठेवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहेत.
पाहा व्हिडीओ : Shinde Fadanvis Pawar Meeting : वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांची बैठक