Nana Patekar On Anil Kapoor :  भारतीय सिनेसृष्टीमधील दमदार अभिनयासाठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) ओळखले जाताात. नाना पाटेकर यांना पहिल्यांदा 'परिंदा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी 'अण्णा' या खलनायकाची भूमिका साकारली होती. 'परिंदा' मध्ये जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचीही भूमिका होती. त्यात हे दोघेही भाऊ म्हणून झळकले होते. मात्र, या चित्रपटातून अनिल कपूर यांनी नाना पाटेकरांचा पत्ता कट केला होता. 


नाना पाटेकर यांनी  'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर गौप्यस्फोट केला. नाना पाटेकर यांनी सांगितले की, परिंदामध्ये जॅकी श्रॉफने साकारलेली भूमिका मी साकारणार होतो आणि अण्णाची भूमिका नसिरुद्दीन शाह साकारणार होते.मात्र, काही कारणाने नसिरुद्दीन या चित्रपटातून बाहेर पडले.  मी आणि अनिल यांनी आमच्या सीन्सची रिहर्सल केली होती पण अचानकपणे मला चित्रपटातून काढण्यात आले. 


नाना पाटेकर यांनी सांगितले की, नुकतीच मी परिंदाबाबत अनिल कपूरसोबत चर्चा केली. त्यावेळी विचारले की, अरे, तू विनोदला असं काय सांगितले की मला त्या भूमिकेतून काढण्यात आले. त्यावेळी अनिल कपूरने सांगितले की, 'खरं सांगू नाना, काय झालं माहीत आहे का? मला वाटलं नानाला स्टार का करावं!' जॅकीची भूमिका जो करेल तो स्टार होणार हे उघड होत असेही नाना पाटेकर यांनी म्हटले. 


नाना पाटेकर यांनी पुढे सांगितले की, 'मी अनिलला म्हटले होते की मला कोणतीही भूमिका द्या, मीच स्टार होणार, तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. सध्या आपल्यात आणि अनिल कपूरमध्ये चांगले संबंध असल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले. परिंदामधून काढल्यानंतर मी रंगभूमीवर काम करू लागलो. त्यानंतर पुढे 3-4 महिन्यांनी विधू विनोद चोप्रा आले आणि त्यांनी अण्णाची भूमिका ऑफर केली.


या अटींवर नानांनी दिला 'परिंदा'ला होकार


दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना पाहून सुरुवातीला राग आल्याचे नानांनी मुलाखतीत सांगितले. मी भूमिकेला होकार दिला. त्यावेळी विधूने सांगितले की तो मला मार्केटनुसार तुला मानधन देईल. यावर तुला ते द्यावेच लागतील, तू उपकार करत नाही. पण ती व्यक्तीरेखा मी लिहिणार अशी अट घातली असल्याचे नानांनी सांगितले. 


नाना पाटेकर यांनी मुलाखतीत सांगितले की, अण्णा आगीत जळतोय तो सीन मी लिहिला होता. त्या आगीत खरंच मी जळालो होतो. त्या घटनेच्या एक वर्षभर मी काहीच करू शकलो नाही. जवळपास दोन महिने हॉस्पिटलमध्ये होतो. माणसाला जळण्यासाठी फक्त 5 सेकंदच लागतात असेही नानांनी सांगितले. माझ्यासोबत झालेला अपघात होता, त्यावर आता फार बोलू नये असेही त्यांनी म्हटले.