मुंबई: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संसदेत व बाहेर दहा वर्षे जे केले त्यास 'नौटंकी' असेच म्हणतात. आता तेच मोदी बहुमत गमावल्यावर थोडे जमिनीवर आले व संसद अधिवेशनाच्या (Parliament Session) पहिल्याच दिवशी बोलून गेले की, "देशाच्या जनतेला संसदेत नौटंकी, हंगामा, नारेबाजी नको आहे. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे." मोदी (PM Modi) यांनी हे सांगणे म्हणजे हुकूमशहाने गीता वाचण्यासारखेच आहे, अशी खोचक टिप्पणी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून करण्यात आली आहे. 


मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता. कालच्या लोकसभेत मोदी व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीने बहुमत गमावले. लोकांनी त्यांना कुबड्यांवर आणले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत आल्यावर मोदी यांना लोकशाही वगैरेची आठवण झाली. "कोण राहुल गांधी?" अशी चेष्टा करणाऱ्या मोदींना सोमवारी खासदारकीची शपथ घेताना पहिल्या बाकावर बसलेल्या राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना 'राम राम' घालून पुढे जावे लागले. हे देशात मजबूत विरोधी पक्ष अवतरल्याचे लक्षण आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.


अर्थात, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही याप्रमाणे मोदींचे वागणे आहे. मोदी यांनी दहा वर्षात लोकसभेत विरोधी पक्षनेता बनू दिला नाही. विरोधी पक्षनेत्यांशिवाय संसद चालवली. आता विरोधकांचे बळ इतके प्रचंड आहे की, मोदींच्या ईस्ट इंडिया कंपनीने कितीही आपटली तरी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड ते रोखू शकत नाहीत व त्याच वेदनेच्या कळा त्यांच्या व अमित शहांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नावाने डबडे वाजवणाऱ्या मोदी यांनी लोकसभा व राज्यसभेतून एकाच झटक्यात दीडशेच्या आसपास खासदारांना निलंबित केले होते आणि त्या रिकाम्या सदनात मोदी स्वतःच्या चमच्यांकडून बाके वाजवून घेत होते. हे चित्र आणीबाणीपेक्षा काळेकुट्ट होते. मोदी आजही काँग्रेसला आणीबाणीची आठवण करून देतात हा नौटंकीचाच एक भाग आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.


सुंभ जळाला, पिळही जाईल; 'सामना'तून बोचरी टीका


दीडशे खासदारांचे निलंबन करणाऱ्या ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी बसवणे हा लोकशाहीचा अपमान मोदी करतात व पुन्हा देशाला आणीबाणीची आठवण करून देतात. त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन जाऊ अशी भाषा करतात. तसे असेल तर मोदी यांनी शब्दास जागावे व लोकसभेचे उपाध्यक्षपद 240 संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावे. तर मोदी खरे. त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू, नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असेच म्हणावे लागेल. अर्थात सुंभ जळालाच आहे, पीळ वरवरचा आहे. हा पीळही जाईल.


मोदींनी त्यांच्या दोन उद्योगपती मित्रांना मालामाल करण्यासाठी सार्वजनिक उपक्रम विकायला काढले. विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांचाही लिलाव केला, पण शेवटी जनतेने मोदी व त्यांच्या लोकांना जमिनीवर आणले. त्यामुळे आता लोकसभेत मोदी यांना मनमानी करणे शक्य नाही. त्यामुळे मोदी व त्यांच्या ईस्ट इंडियाची बाजू आता कमजोर पडली आहे. मोदी यांच्या नौटंकीस लगाम घालणारी ताकद त्यांच्या समोरच्या बाकावरच आहे. मोदी यांचे रडणे, नकला करणे, चित्रविचित्र हावभाव करून छाती पिटणे, गरीबांचे कैवारी असल्याचे ढोंग रचणे हे सर्व नाटक बंद करणारा जबाबदार विरोधी पक्ष जनतेने संसदेत पाठवला आहे. मोदी व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे दुखणे तेच आहे. राहल गांधी यांचे पहिल्या बाकावरच दर्शन घेऊन 'राम राम' करून मोदी यांना रोज पुढे जावे लागेल. हे देशात लोकशाही अवतरल्याचे लक्षण आहे, असे सामनात म्हटले आहे. 


आणखी वाचा


'240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही'; संजय राऊत नाशिकमधून गरजले