राज्यात पुन्हा मास्क सक्ती? लवकरच निर्णयाची शक्यता; आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
Maharashtra Corona cases Mask : राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.
Maharashtra Corona cases Mask Compulsion : देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अस मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मास्कसक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.
केंद्र सरकार सतर्क, पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
देशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस?
या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या