(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Tiffin Meetings: फाईव्ह स्टार हॉटेलमधले जेवण मागवून भाजपाची ‘टिफिन नौटंकी’; काँग्रेसचे टीकास्त्र
Congress On BJP: महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
Congress On BJP Tiffin Meetings: भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सध्या राज्यात विविध ठिकाणी 'टिफीन बैठका' (BJP Tiffin Meetings) सुरू आहेत. या बैठकांच्या निमित्ताने भाजपचे नेते आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. भाजपच्या टिफिन मिटींगवर काँग्रेसने टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची नौंटकी करत आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपाने ‘चाय पे चर्चा’ नंतर आता ‘टिफिन बैठकी’चा नवा फंडा आणला आहे. नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष झाल्यानिमित्त भाजपाने खायचा हा नवा फंडा आणला आहे. 9 वर्षे भाजपाने भ्रष्टमार्गाने खा-खा खाल्ले तरीही त्यांना पुन्हा खायचेच डोहाळे लागले असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
टिफिन बैठकांच्या नावाखाली भाजप नेते मस्त पार्ट्या झोडत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला. खाद्यतेल 80 रुपयांवरून 200 रुपये लिटर, पीठ 28 रुपयांवरून 40 रुपये किलो, दूध 40 रुपयांवरून 60 रुपये लिटर, डाळी 150 रुपये किलो तर गॅस सिलिंडर 450 वरुन 1200 रुपये झाले असल्याने सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. रोजगार घटत आहेत, शेतमालाला भाव नाही. त्यातच ‘9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरिब कल्याणाची’ असे म्हणत भाजपा गरिबांची थट्टा करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन देणारे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. परंतु आत्महत्या मात्र दुपटीपेक्षा जास्त वाढल्या असल्याचे काँग्रेसने म्हटले. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, गरिबांची संख्या मोदी सरकारच्या काळात वाढली आणि आता 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. 140 कोटी लोकसंख्येतील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणे हे अभिमानाची नाही तर लाजीरवाणी बाब आहे, मोदी सरकारने 80 कोटी लोकांना गरिब केले असून गरीब कल्याणाच्या बाता मारल्या जात असल्याचा आरोप लोंढे यांनी केला. मोदी सरकारच्या काळात जनता उपाशी असून भाजपावाले मात्र तुपाशी आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.