Maharashtra Collage Reopen : महाविद्यालयं सुरु होणार? आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
Maharashtra Collage Reopen : पुण्यात महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अजित पवारांनी घोषणा केली होती. परंतु, याबाबत संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळाली.
Maharashtra Collage Reopen : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, कालपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे.
राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता व्हीसीद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सोबत बैठक घेणार आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल? कशा प्रकारच्या गाईडलाईन्स तयार कराव्या लागतील? याशिवाय वस्तीगृह सुरु करणं आणि इतर बाबींवर सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा करतील आणि त्यानंतर महाविद्यालय दिवाळीनंतर नेमकी कधी सुरु करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.
येत्या दोन दिवसांत राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार आहे. पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरु झाली आहेत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशी माहिती दिली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचनेवरून पुण्यातील महाविद्यालय सुरु झाली आहेत, असंही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. तसेच दोन दिवसांत तारीख आणि नियमावली दोन्ही गोष्टी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. अशातच राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यामुळं राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयं आणि विद्यापीठं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. परंतु काल या निर्णयाबाबत संभ्रम पाहायला मिळाला होता. आजच्या बैठकीनंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहे, मात्र कोरोना नियमाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं होतं. सोबतच पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात एकीकडे कॉलेजेस सुरु होत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळंही सुरु करण्यात आली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरु होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि पर्यटन स्थळं सुरु होणार आहेत.