Maharashtra Temperature : राज्यातील पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार; विदर्भात थंडीची लाट, मुंबईकरही गारठणार
Maharashtra Temperature : 9 जानेवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Maharashtra Temperature : महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात थंडीमुळे (Cold) हुडहुडी भरलेली असताना, 9 जानेवारीनंतर तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात थंडीची लाट येऊ शकते तर पुढील आठवड्यात मुंबईतील (Mumbai) तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात एक अंकी तापमानाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 9 जानेवारीनंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळेल. आज आणि उद्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात थंटीच्या लाटेचा अंदाज आहे. गोंदियामध्ये चार दिवसांपासून तापमानात घट झालेली आहे. आज गोंदिया जिल्हाचा पारा 7 अंशावर पोहोचला असून विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील औरंगाबाद तसंच जालन्यात 9 जानेवारीनंतर एक अंकी तापमानाची शक्यता आहे.
मुंबईकरही गारठणार
तर एरव्ही घामाच्या धारांमध्ये भिजलेले मुंबईकर सध्या थंडीचा अनुभव घेत आहेत. परंतु पुढील आठवड्यात 13 आणि 14 जानेवारीच्या दरम्यान मुंबईतील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याचा अंदाज आहे.
बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम
बदलत्या हवामानामुळे पिकांवर परिमाण जाणवणारा असला असून सध्या रब्बी पिकांच्या धान पिकांचे परे पेरली असून गारव्यामुळे पऱ्यांची वाढ खुंटून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, गारठा वाढल्याने फुलकोबी पिकांवर अडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून कोबी पिवळी पडू लागली आहे.
पुढील दोन दिवस मुंबई-पुण्यातील हवा प्रदूषित राहणार
मुंबईतील हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे. पुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय 300 पारच राहणार, असा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था सफरने वर्तवला आहे. तर पुण्यातही हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत असून इथला सरासरी एक्यूआय 215 च्या वर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज सफरने व्यक्त केला.
हेही वाचा