Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा असाही विक्रम! ठाकरेंपेक्षा दुप्पट फाईलींवर सह्या, तिप्पट कामांना मंजुरी
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे आणि शिंदे सरकारच्या कालावधीची तुलना करता शिंदे सरकारने ठाकरेंपेक्षा दुप्पट फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत.
मुंबई : एकीकडे राज्य सरकारमधील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये फाईलींच्या अडवणुकीवरून वाद झाल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे एक मोठी माहिती समोर आली आहे. फाईलींचा निपटारा करण्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने विक्रमी कामगिरी केली आहे. फाईलींचा निपटारा करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेग धारण केला, तर तिप्पट कामांना मंजुरी दिल्याची माहिती आहे.
राज्यातील जनतेच्या विकासकामांच्या फाईल्स अतिशय वेगाने पाठपुरवठा करून मुख्यमंत्री कार्यलयाकडून मंजूर करण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारपेक्षा शिंदे सरकारने फाईल्सचा विक्रमी निपटारा केला आहे. ठाकरेंच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी दुप्पट फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत. तसेच याच कालावधीत, ठाकरे सरकारच्या तुलनेत तिप्पट कामांना मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
काय सांगतेय आकडेवारी?
1) गेल्या 25 महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयात 23 हज़ार 674 फ़ाईल्स आल्या होत्या. त्यापैकी 22,364 फाईल्स मंजूर केल्या आहेत.
2) राज्याच्या मुख्यमंत्री कार्यलयाची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे.
3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ - 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024
4) ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात 11,227 फाईल्सपैकी 6,824 फाईल्स मंजूर झाल्या होत्या.
5) ठाकरे सरकारचा कार्यकाळ - 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2022.