CM Uddhav Thackeray Speech : आनंद महिंद्रा यांचा सल्ला ऐकून, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले...
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचा इशारा दिला. पण, लॉकडाऊनची घोषणा मात्र केली नाही. याचवेळी त्यांनी लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्यांना स्पष्च शब्दांत उत्तरही दिलं.
CM Uddhav Thackeray Speech राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचा इशारा दिला. पण, लॉकडाऊनची घोषणा मात्र केली नाही. याचवेळी त्यांनी लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरही दिलं.
काही दिवसांपूर्वी राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला देणाऱ्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता त्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. आरोग्य सेवांवर आपण भर देतच आहोत असं म्हणत यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचाही यावेळी विचार केला जाणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला.
'हे जे सर्व सल्ले देत आहेत, उद्योगपती ज्यांनी आरोग्य व्यवस्था वाढविण्यास सांगितले त्यांना सांगतो,मला रोज 50000 डॉक्टर्सची सोय करा. तज्ज्ञ लोकं, डॉक्टर्स कुठुन आणायचे ?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या राजकीय नेतेमंडळींनी जनतेच्या जीवाशी खेळू नये असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?
लॉकडाऊनला मध्यमवर्गीय घटकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो, यामागचं कारणंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं होतं. 'उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया', असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.
कोरोनाशी लढण्यासाठी एकजुटीनं सिद्ध होऊया....
कोरोना काळातील आव्हानं आणि वस्तुस्थिती लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेवर आपला विश्वास असल्याचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आता नागरिकांच्या जबाबदारपणाचीच मदत होणार असल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.