(Source: Poll of Polls)
Tadoba Tiger Reserve : वाघांना पकडण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच खास गाडी
Tadoba Tiger Reserve : माणसांसाठी धोकादायक झालेल्या किंवा जखमी वाघांना पकडण्यासाठी आपल्या राज्यात पहिल्यांदाच एक खास रेस्क्यू व्हॅन तयार करण्यात आली आहे.
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एक खास रेस्क्यू व्हॅन भेट देण्यात आली. ही खास रेस्क्यू व्हॅन वाघ आणि त्यासारख्या वन्यजीवांना डार्ट मारून बेशुध्द करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. माणसांसाठी धोकादायक झालेल्या किंवा जखमी वाघांना पकडण्यासाठी आपल्या राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची गाडी तयार करण्यात आली आहे. वाघांना पकडतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या खास वाहनाची निर्मिती झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आज हे वाहन एका छोटेखानी समारंभानंतर दाखल झाले आहे. प्रसिध्द उद्योजक विवेक गोयंका आणि झिता गोयंका यांनी ही गाडी तयार करण्याचा आर्थिक खर्च उचलला आहे. वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये हे यावेळी उपस्थित होते.
मानव-वन्यजीव संघर्षामुळे किंवा जखमी झाल्यामुळे अनेक वेळा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते. मात्र वाघ पकडण्याची ही मोहीम अनेक वेळा खूप दिवस चालते. यामुळे श्रम-पैसा आणि वेळ यांचा खूप अपव्यय होतो. वाघ पकडण्यासाठी सध्या प्रचलीत असलेली पद्धत म्हणजे वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करणे. यासाठी पाळीव प्राणी एखाद्या ठिकाणी बांधून वाघ त्या पाळीव प्राण्याची शिकार करेल याची वाट पहावी लागते, मग वाघ ती शिकार खाण्यात गुंग असला की त्याला डार्ट मारला जातो. मात्र वाघ जर आक्रमक झाला किंवा अडचणीच्या जागी असेल तर त्याला पकडणं अवघड जातं. सोबतच वाघ पकडायला वेळ लागल्यास हा उशीर वाघ किंवा माणसांच्या जीवावर बेतू शकते. वाघाला पकडण्यासाठी उशीर झाल्यामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागल्याची आपल्या राज्यात उदाहरणं आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील RT वन आणि यवतमाळ जिल्ह्यातील अवनी हे तर सर्वांना माहित असलेली उदाहरणं आहेत. हीच समस्या लक्षात घेत आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिध्द असलेले वन्यजीव प्रेमी धनंजय बापट यांनी एक गाडी तयार करण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर या क्षेत्रात ख्याती असलेल्या नागपूरच्या श्रीश देवधर यांच्याकडे त्यांनी अशा प्रकारची गाडी डिजाईन करण्याचा आग्रह धरला. जंगलातील अतिशय दुर्गम भागात आणि मुख्यतः पावसाळ्यात देखील ही गाडी काम करू शकेल या कडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे मॉडिफाइड सस्पेंशन, इंपोर्टेड टायर्स आणि जास्त हॉर्स पॉवरचं इंजिन लावून ही गाडी अतिशय "दमदार" करण्यात आली आहे. या शिवाय गाडी वर विंच लावण्यात आले आहे ज्यामुळे ही गाडी कुठेही फसल्यास किंवा उलटल्यास स्वतः ला बाहेर काढू शकते. ही खास गाडी वनविभागाच्या ताफ्यात दाखल झाल्याने आता वनविभागाला वाघ आणि तत्सम वन्यप्राण्यांना रेस्क्यू करणं अतिशय सोपं होण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या :
Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खुल्या जिप्सी बंद, आता 'हा' पर्याय