केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग खाते सुरु करावे, हिजाबवरील वादावर जितेंद्र आव्हाडांचा टोला
मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असे खाते सुरु करा, त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला.
Jitendra Awhad, Maharashtra Cabinet Minister : लोकांनी काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्रामध्ये एक मंत्रीच करा, मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असे खाते सुरु करा, त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला. ते कल्याणध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. महापालिका निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा असे आवाहन केले. या कार्यकर्ता मेळाव्यात मोठया प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात गेल्या निवडणुकीत निवडून आलेले व भाजपला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत कुणाल पाटील यांनी येत्या काही दिवसात माझ्यासह आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात राष्ट्रवादीमध्ये इंकमिंग सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे .
केडीएमसीत महाविकास आघाडी होणार का?
केडीएमसी निवडणूकीत शिवसेनेसोबत आघाडी होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, आघाडी धर्माचे पालन करणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतोय, आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र त्यांच्या मनात हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही.
कल्याण डोंबिवलीत विकास फक्त विकास म्हात्रेंच्या घरी - आव्हाड
कल्याण डोंबिवलीत विकास हरवला आहे. तो फक्त विकास म्हात्रे यांच्या घरीच झाला आहे, अशी टीका भाजप नगरसेवकाचे थेट नाव घेऊन जितेंद्र आव्हान यांनी केली.