Maharashtra Budget Session : अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
अंगणवाडी सेविकांच्या (Anganewadi Workers) प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या मागण्यांवरुन विरोधकांनी सभात्याग केला आहे.
Maharashtra Budget Session : अंगणवाडी सेविकांच्या (Anganewadi Workers) प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या मागण्यांवरुन विरोधकांनी सभात्याग केला. अंगणवाडी सेविकांच्या मुद्यावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. विरोधी पक्षातील आमदारांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवला. त्यांना समान काम समान वेतन द्यावं, पेन्शन द्यावी आदी मागण्या मांडल्याची माहिती मांजी मंत्री आणि काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. फक्त मागण्या मान्य करु असे आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्या संदर्भात सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज (3 मार्च) सकाळपासूनच सभागृहात विरोधकांनी या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Jayant Patil : मंत्री असताना उत्तर देता येत नसेल तर ते योग्य नाही
अंगणवाडी सेविका आणि मदतीनीस यांचा प्रश्न विधानभवनात मंडण्यात आला. मात्र, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून थातूरमातूर उत्तर देण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी दिली. मंत्री असताना उत्तर देता येत नसेल तर ते योग्य नाही. उद्या येणाऱ्या अर्थसंकल्पत काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं जाईल. पण आमची मागणी आहे आताच यावर उत्तर दिलं पाहिजे. आम्ही हा प्रश्न लावून धरला पण त्यांनी आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं नाही. म्हणून आम्ही सभात्याग केल्याचे जयंत पाटील म्हणाले.
Dhananjay Munde : 100 सदस्यांनी प्रश्न उपस्थित करुनही मंत्री बघू बघू म्हणतायेत
आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्याची माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली. अंगणवाडी सेविकांच्या मुद्यावर या सरकारची भूमिका योग्य नसल्याचे मुंडे म्हणाले. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करुन देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील तर हे योग्य नसल्याचे मुंडे म्हणाले. अंगणवाडी सेविकांच्या या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होते. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होताना पाहायला मिळत होता.
महत्त्वाच्या बातम्या: