Maharashtra Budget Session : अजितदादा म्हणाले, प्रवीण दरेकर को गुस्सा क्यो आता है? दरेकर म्हणतात...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात टोलेबाजी पाहायला मिळाली.
Maharashtra Budget Session : विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. सभागृहात विविध मुद्यावरुन सरकार आणि विरोधक आमने सामने येत आहेत. तर काही वेळेला राजकीय नेते एकमेकांवर टोलेबाजी देखील करताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. प्रविण दरेकर आजकाल खूप तापतात. दरेकर साहब को घुस्सा क्यु आता है, असा टोला यावेळी अजित पवार यांनी दरेकरांना लगावला. यामागे तुमची काही कारणे असू शकतात असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या टोलेबाजीनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हेदेखील विधानपरिषदेत बोलले. दादा म्हणाले दरेकर को घुस्सा क्यु आता है. सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजुला काढून ठेवावे लागतात. मात्र, सध्या सहकारमध्ये राजकारण सुरु असल्याचे दरेकर म्हणाले. सहकार संस्थांवर कारवाईपेक्षा उपाययोजना महत्वाच्या असल्याचे दरेकर म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखाना सभासदांचा होता, तो खासगीत काढला जातो आणि चांगला चालतो. 70 ते 80 टक्के कारखाने खासगी झाल्याचे दरेकर म्हणाले. साखर कारखान्यांना थकहमी दिली ते चांगलं झालं. पण काही विशीष्ट कारखान्यांनाच थकहमी देऊन उपयोग नाही असेही दरेकर म्हणाले. सूतगिरण्या इतर सहकारी कारखाने यांचाही विचार व्हावा असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.
निलम गोऱ्हे आणि प्रविण दरेकर यांच्यात खडाजंगी
विधानपरिषदेत उपसभापती निलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. निलम गोऱ्हे बोलायला वेळ देत नाहीत, बोलण्यात व्यत्यय आणतात असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. यावर मला धमक्या देऊ नका असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. सभागृहात सुरु असलेल्या वक्तव्यांवरुन मी व्यथीत झाले आहे. मी सभापतींना निरोप देऊन बोलावून घेतलं असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. याआधीही बोलण्याच्या वेळेवरुन उपसभापती निलम गोऱ्हे आणि गोपिचंद पडळकर यांच्यात वाद झाला होता. विधानपरिषदेत उपसभापती निलम गोऱ्हे बोलण्यात व्यत्यय आणतात म्हणूनच आम्ही अविश्वास ठराव आणत होतो, पुन्हा आणु शकतो असेही प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.
मोबाईल टॉवर कंपन्यांना विद्युत शुल्क माफ नाही : अजित पवार
मोबाईल टॉवर कंपन्यांना विद्युत शुल्क माफ करण्याचं काही कारण नसल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. विदर्भात जर मोबाईल टॉवरचे विद्युत शुल्क माफ केले असेल तर त्याची चौकशी करु असेही अजित पवार यावेली म्हणाले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 हजार कोटी रुपयांचे विद्युत शुल्क माफ केल्याचा आरोप केला होता. यावर अजित पवार बोलत होते. विकास मंडळे नसतानाही विदर्भाला सर्वाधिक 23 ऐवजी 26 टक्के निधी दिला आहे. मराठवाड्याला 18 टक्के तर ऊर्वरीत महाराष्ट्राला 55 टक्के निधी दिला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.