(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Narvekar: आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात, चूक लक्षात येताच म्हणाले...
आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले.
Milind Narvekar : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget) अधिवेशनला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. सुरक्षारक्षकांनी नार्वेकरांना सभागृहात कसे सोडले? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मिलिंद नार्वेकर म्हणतात...
नार्वेकरांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो, असे देखील नार्वेकर म्हणाले.
मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात : संजय शिरसाट
शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणाले, "मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सभागृहात येण्याची घाई झाली आहे. उद्धव ठाकरे देखील त्यांना आता जवळ करत नाही त्यांच्या आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आमच्याकडे किती इनकमिंग आहे. हे लवकरच कळणार आहे."
राजकीय वर्तुळात नार्वेकरांची जोरदार चर्चा
मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व आलं आहे. एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी आल्याने या दोघांमधील मैत्री उघड झाली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही तर मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नार्वेकरांची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात नार्वेकरांची जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे अनेक मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांचा भार आहे. त्यामुळे हे मंत्री सर्व विभागांना न्याय देऊ शकतील का हादेखील प्रश्न विचारला जातोय. शेतमालाचे गडगडलेले दर, पीकविमा, वीजबिल, पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळाचीही शक्यता आहे