नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसकडून आणखी दोघांना अटक
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसनं जळगावच्या साकली गावातील दोघांना अटक केली आहे. दोघांवर दाभोलकर यांच्या हत्येत सहभाग असल्याच संशय आहे.
जळगाव : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसनं जळगावच्या साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावं आहेत. वासुदेव सूर्यवंशीला याआधीच एटीएसनं ताब्यात घेतलं होतं.
आज दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूर्यवंशी याने अंनिसचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडादरम्यान वाहनाची व्यवस्था केल्याचा एटीएसला संशय आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा स्फोटकं आणि दाभोलकर हत्येप्रकरणी अटकसत्र
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपाऱ्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरी धाड टाकली. या धाडीत त्यांना स्फोटकं सापडली. याप्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 10 ऑगस्टला अटक केली.
नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. मग एटीएसने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून 18 ऑगस्टला रात्री अटक केली. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या
नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतून एकाला बेड्या
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रावरुन नवा वाद
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?
दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी