Winter assembly session Nagpur : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी, 95 कोटींच्या निविदा आज खुलणार
Maharashtra Assembly Winter Session: पुढील महिन्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारकडून हे अधिवेशन तीन आठवडे घेण्याचा प्रयत्न आहे.
Nagpur News : दोन वर्षानंतर नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) पार पडणार आहे. त्यानिमित्ताने देखभाल दुरुस्ती, सुविधेसह विविध कामांसाठी 95 कोटींची निविदा (Tender) काढण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. आज विधीमंडळ अधिवेशनासाठीच्या (Assembly Session Nagpur) सर्व कामांच्या निविदा उघडण्यात येणार आहे. या निविदांकडे कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे.
पुढील महिन्यात 19 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन वर्ष अधिवेशन होऊ शकले नाही. आघाडीच्या दुसऱ्या वर्षांच्या काळात कोरोना ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र तसे झाले नाही. हिवाळी अधिवेशनदेखील मुंबईत पार पडले. त्यामुळे विदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती. सत्तांतरानंतर मुंबईत झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केली होती.
शिंदेसेना- भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपुरलाच होईल, असे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी खर्चाचा आढावा घेतला. 95 कोटी रुपये अपेक्षित खर्च काढला. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत.
अधिवेशनापूर्वी सभापती, अध्यक्ष पुन्हा नागपुरात
विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 15 नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात येणार आहे. यावर्षी सध्या तरी दोन आठवड्यांचे अधिवेशन होणार असले तरी ते कामकाज तीन आठवडे चालविण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. तशा सूचना सरकारतर्फे अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. अधिवेशनासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास इतर शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्तीसोबत रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यावर्षी अधिवेशनावर होणाऱ्या खर्चात वाढ अपेक्षित असून प्रशासनाने 95 कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्याचे टेंडर आज उघडणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरसह बांधकाम, वीज व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
अधिवेशन तीन आठवडे चालणार ?
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2 आठवडे घेण्याचे निश्चित झाले असली तरी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवडा वाढवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मागील काळात झालेल्या एका बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तशा सूचना दिल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास हे अधिवेशन तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी