Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आज पुन्हा आमने-सामने
Maharashtra Assembly Winter Session: आज विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून निवदेन सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी असणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतवून लावण्यास सत्ताधाऱ्यांकडून रणनीति ठरवण्यात आली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे, बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर सुरू असलेली दडपशाही आदी मुद्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. तर, दुसरीकडे विरोधी पक्षांच्याविरोधात शिंदे गटाचे आणि भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. संतांबाबत केलेले कथित वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी माफी मागण्याची मागणी भाजप आमदारांनी केली. तर, शिंदे गटाच्या आमदारांनी 'पन्नास खोके, एकदम ओके' या घोषणेला प्रत्युत्तर दिले.
विधीमंडळात विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण, समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा, विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना देण्यात आलेली स्थगिती, श्रद्धा वालकर हत्याकांड आदी मुद्यांवर चर्चा झाली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत खडाजंगी झाली होती. समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गावरील चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावलेल्या टोल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांनी प्रतिटोला लगावला.
मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
नागपूर न्यास प्रकरणात आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे सांगत विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. भूखंड विक्रीबाबत घेतलेला निर्णय हा नियमांनुसार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण कोर्टात आहे, याची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती असेही त्यांनी म्हटले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्लाबोल केला.
विधीमंडळ अधिवेशनावर 11 मोर्चे
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अकरा मोर्चे निघणार असून त्यामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे. तर मुस्लिम आरक्षण व इतर मागण्यांसाठी एमआयएम पक्षाकडूनही मोर्चा काढला जाणार आहे. याशिवाय इतर नऊ छोटे मोर्चेही असणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
