(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सभागृहात मास्क न वापरण्यावरून अजितदादांचा संताप, मंत्र्यांसह सदस्यांना झापलं
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून संताप व्यक्त केला.
Ajit Pawar : विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले की, देशाचे पंतप्रधान हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. तर येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्व सदस्यांना मास्क वापराची विनंती करत ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.
कोरोना महासाथीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कचा वापर करण्याचे सातत्याने आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनादेखील मास्क न वापरण्यावरून त्यांनी खडे बोल सुनावले होते.
दरम्यान, राज्यात बुधवारी 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात बुधवारपर्यंत (22 डिसेंबर 2021) 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के इतके झाले आहे.