एक्स्प्लोर
राज्यात अंदाजे 60.46 टक्के मतदान : मुख्य निवडणूक अधिकारी
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात मतदानाची वेळ संपली आहे. राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.46 टक्के इतके मतदान झाले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही.
राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.
जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे
अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.
प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.
ईव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासात सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानामध्ये 10 टक्क्याहून अधिक भर पडत 54.53 टक्के मतदान झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement