लोणावळाकरांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखला; वाहतूक ठप्प, रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक
Lonavla old Pune-Mumbai highway Rasta roko : लोणावळाकरांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. वाढते अपघात शहरवासियांच्या जीवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.
Lonavla old Pune-Mumbai highway Rasta roko : लोणावळाकरांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. वाढते अपघात शहरवासियांच्या जीवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात अन् तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पर्यायी मार्ग आता खुले केले जात आहेत. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. परंतु एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी त्याला गांभीर्याने घेत नाहीये. म्हणूनच आज आक्रमक पवित्रा घेत, महामार्गावरील कुमार रिसॉर्ट चौकात रास्ता रोको सुरू करण्यात आला आहे.
पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आतुर असणाऱ्या, त्यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या लोणावळकरांनी आज रास्ता रोकोची भूमिका घेतली. शहरातून जाणारा पुणे-मुंबई महामार्ग नागरिकांच्या जीवावर उठताना दिसतोय, तरी प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन बसलाय. म्हणूनच आज लोणावळकर आक्रमक झालेत. रविवार म्हणजे लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घ्यायला पर्यटकांची ठरलेली गर्दी. पण त्याच दिवशी रास्ता रोको केल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीत अडकावं लागलंय.
पुणे-मुंबई महामार्ग हा लोणावळ्यातून जाताना अरुंद होतो, त्यामुळं अनेकदा अपघात झालेत. यात काही नागरिकांना जीव गमवावा लागलाय, म्हणूनच या मार्गाचे रुंदीकरण करावे यासाठी शहरवासीयांनी एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीकडे मागणी केली. पण त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतापलेले नागरिक आज रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पुणे आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश पर्यटक आज लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटायला येत असतात. पण त्या सर्वांना या रास्ता रोकोमुळं वाहतूक कोंडीत ताटकळावं लागलंय. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीला धारेवर धरण्यासाठी शहरवासीयांनी ही भूमिका घेतलेली आहे.
या आंदोलनाला कोणतंही वेगळं अथवा राजकीय वळण लागू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून सगळे या आंदोलनात सहभागी झालेत.या जागरूक नागरिकांचा रोष हा पर्यटकांवर नसून बेशिस्तपणे प्रवास करणाऱ्या अजवड वाहतुकीवर आहे. ही वाहतूक अरुंद रस्त्यात ही बेदरकरारपणे सुरु असते, असं या जागरूक नागरिकांचं म्हणणं आहे. ही अवजड वाहतूक शिस्तीत जात नाही किमान रुंदीकरण करून त्यावर तोडगा काढा. अशी मागणी हे नागरिकांना वारंवार करत आलेत.
पण एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीकडे झोपेचं सोंग घेऊन बसलीये, ते आमच्या मागणीला गांभीर्याने घेतच नाहीत. असा आरोप ते करतायेत. म्हणूनच नाईलाजास्तव आज रास्ता रोको करण्याचा आक्रमक पवित्र घेतल्याचं ते सांगतायेत. शहराची आर्थिक उलाढाल करणारे आमच्या देवासमान पर्यटकांना कोणताही त्रास देण्याचा आमचा हेतू नसल्याचं ते सांगतायेत. या पर्यटक आणि प्रवाश्यांसाठी पर्यायी मार्गाची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येत होती.