Nana Patole: नाना पटोलेंची राजकीय धुळवड! देवेंद्र फडणवीसांसह सत्ताधाऱ्यांवर मार्मिक टोलेबाजी
Nana Patole: देशभरात आज होळीची धुळवड मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील होळीचा सण साजरा करत आपल्या राजकीय विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी केलीय.
Maharashtra Congress : देशभरात आज होळी (Holi 2024) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) देखील होळीचा सण साजरा करत या धुळवडीच्या निमित्ताने आपल्या राजकीय विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना(Ajit Pawar)काही सल्ले देखील दिले.
राजकारणातले आमचे काही मित्र काही केल्या दुरुस्त होत नाही. आज होळीच्या निमित्ताने माझ्या त्यांना सल्ला असेल की, सत्तेचा फायदा हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यात असतो. होळीच्या रंगाप्रमाणेच राजकारणात देखील प्रेमाचे रंग असायला हवेत. मात्र, राजकारणाचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी बोलतांना दिली. ते आज नागपूरात बोलत होते.
भाजप म्हणजे अतिशय भयंकर पक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराज होऊ पाहत आहेत, मात्र त्यांना यश येत नाही. शिंदे म्हणजे एक वेगळेच मॅजिक असल्याचेही नाना पटोले म्हणाले.सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मी भाजपमध्ये असल्याने मी एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला होता. भाजप म्हणजे अतिशय भयंकर पक्ष आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे मला म्हणाले होते मी देखील भयंकर आहे. मात्र आता त्या बिचार्यांना लोकसभेच्या जागा देखील मिळू शकत नाहीये. त्यामुळे आमच्या एकनाथरावांची किती खराब हालत झालीय हे दिसतंय.
एकनाथरावांनी तेव्हा आमचे ऐकलं असते तर ते आज मजेत असते. असे देखील नाना पटोले म्हणाले. अजित पवार म्हणजे त्यांची कमालच आहे. एकीकडे त्यांचे भाऊ स्वतः त्यांच्यावर काय भाष्य करतात आहे हे आपण बघतोच आहे. त्यामुळे अजित पवारांवर आपण फार काही न बोललेलं बरं, असे म्हणत नाना पटोलेंनी अजित पवारांवर फार भाष्य करणे टाळले आहे.
राजकारणाचा स्तर खालावला
हिंदू संस्कृतीत होळी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक रंग असतात, तसेच अनेक चढ उतार देखील येत असतात. अशातच या रंगांच्या सणांमध्ये अनेक रंगांनी एकत्र यावं आणि एकजुटीने कामाला लागावं असा संदेश होळीचा सण देतो. मात्र अलीकडच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावला आहे. अशा प्रकारचे राजकारण मी यापूर्वी कधीही बघितलेले नाही. त्यामुळे आजच्या दिनी माझा असाही सल्ला राहील की, जीवन जगताना आपल्या सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाने पुढाकार घेऊन राजकारणाचा स्तर खालावेल असे कुठलेही कृत्य करू नये. असा सल्ला देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना दिलाय.
मर्दासारखी मिशी ठेवतो तर मर्दासारखे वागले देखील पाहिजे
सध्याच्या सत्तेत असलेल्या सर्व राजकीय पुढार्यांना मिशा आहे. त्यात कोणाला जाड असतील तर कोणाला बारीक आहे. मात्र, जेव्हा आपण मर्दासारखी मिशी ठेवतो तेव्हा आपण मर्दासारखे वागले देखील पाहिजे. झुकण्याचा बाणा हा आपला नाही. नागपूर विमानतळावर अनेकांना मी झुकताना पाहिले आहे. हे लोक मागे काही बोलतात समोर वेगळे बोलतात. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा हा खऱ्या बाणासारखा राहिला पाहिजे. असे देखील नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आजचा होळीचा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा आणि महाराष्ट्राच्या एकजुटीसाठी सर्वांनी एकत्र यावं, असे देखील नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या