Lockdown In Maharashtra : राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे
लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहितीही त्यांनी दिली.
कोरोना व्हायरस नव्या प्रकारचा आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे हटवता येणार आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता देता येईल याबाबतचे बारकावे तपालसे जातील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
ग्लोबल टेंडरमध्ये मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी किंमत दिली आहे. तर काही कंपन्यांनी किमतीबाबत माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. इतर लसींनाही परवानगी देण्याबाबतचा विषय केंद्राचा आहे. त्यामुळे लशींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल- विजय वडेट्टीवार
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या