Ajit Pawar : ईडीच्या तपासाबाबत राऊत साहेबच बोलू शकतील,अजित पवारांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांची ईडीकडून पुन्हा पुन्हा का चौकशी केली जात आहे, याबाबत राऊत साहेबच बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली
Ajit Pawar : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ED चं पथक दाखल झालं आहे. गेल्या तीन तासाहून अधिक वेळ झालं ED च्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरु आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची ईडीकडून पुन्हा पुन्हा का चौकशी केली जात आहे, याबाबत राऊत साहेबच बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. देशातील कोणत्याही नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार त्या यंत्रणांना असल्याचे पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्या यंत्रणांना देशातील कोणत्याही नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्या यंत्रणांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, त्या मग आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा या यंत्रणा का येतात त्या संदर्भात जास्त राऊत साहेब सांगतील असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार हे सध्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. यया दौऱ्यावेळी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नेमकं प्रकरण काय?
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
राज्याच्या प्रमुखांनी ताबडतोब मंत्रिमंडळ स्थापन करावं : अजित पवार
एक महिना होऊन गेला तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळं राज्याच्या प्रमुखांनी ताबडतोब मंत्रिमंडळ स्थापन करावं अशी मागणी अजित पवार यांनी केली. तत्काळ पालकमंत्र्यांची नेमणूक करावी. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरीही ते सगळीकडे पोहोचू शकत नाहीत. आपले राज्य मोठं आहे, राज्यातील समस्या वेगवेगळ्या आहेत. लोकांना मदत कशी करता येईल, हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता एक महिना पूर्ण झालेला आहे. आता वाटतय या दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असेही अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: