अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार तुमचा माणूस बावचळला आहे, असे म्हणत मिटकरींवर हाकेंनी टीका केली. अजित पवार तुम्ही ओबीसींच्या मुलांना वसतिगृह का देत नाहीत? असा सवाल हाके यांनी केला. अजित पवार यांनी माझ्या पाठीमागे त्यांची पलटण लावली आहे.अमोल मिटकरीचा स्क्रू ढिल्ला झाला आहे असेही हाके म्हणाले.
अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात, आता अजित पवार यांना पंख फुटलेत असेही हाके म्हणाले.
अजित दादांना असा बाण लागला की त्यांना त्यांची अख्खी पिलावळ माझ्या अंगावर सोडावी लागली आहे. आम्ही महायुतीला पाठिंबा दिला, तू आम्हाला विरोध करतोय, तू महायुतीच्या बाजूने आहेस की विरोधात आहे? असा सवाल हाके यांनी मिटकरी यांना केला. ज्याला कोणी हुंगत नाही, अशी माणसं तुम्ही माझ्यावर सोडतात; असेही हाके म्हणाले. सुरज चव्हाण तुला गावातली कुत्रे तरी ओळखतात का? मी कलंक आहे की नाही हे माझा ओबीसी समाज, धनगर समाज ठरवले असे हाके म्हणाले. मला तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही असे हाके म्हणाले.
महाराष्ट्रात होणारं दारूच उत्पादन सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार करतात
भारतातील 80 टक्के दारूच उत्पादन महाराष्ट्रात होतं, महाराष्ट्रात होणारं दारूच उत्पादन सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार आणि भांडवलदार मंडळी करतात असे म्हणत हाकेंनी तटकरे यांच्यावर टीका केली. अमोल मिटकरी जोपर्यंत वायझेड या शब्दाचा अर्थ सांगणार नाही, तोपर्यंत आम्ही त्याला माकडच म्हणणार असे हाके म्हणाले. मी एका वाटीत तोडपाणी करतो, अजित पवार हे समुद्रात तोडपाणी करतात असेही हाके म्हणाले.
आमच्या हक्क अधिकाऱ्यांना कोणी चॅलेंज केलं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही
उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकतो असे म्हणत व्हायरल ऑडियो क्लिपवर लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमोल मिटकरी एकीकडे म्हणतो माझी औकात नाही आणि दुसरीकडे म्हणतो मी उमेदवार मॅनेज करतो असेही हाके म्हणाले. ओबीसींच्या हक्क अधिकाऱ्यांवर अडचण येतेय असं आम्हाला वाटलं तर आम्ही महाराष्ट्र गदागदा हलवून जरांगेंना अडवणार असल्याचा इशाराही हाकेंनी दिला. आमच्या हक्क अधिकाऱ्यांना कोणी चॅलेंज केलं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, मग ते सरकार असो अथवा जरांगे असेही हाके म्हणाले.
























