गेल्या दोन वर्षांपासून NEET ची तयारी केली, परीक्षेच्या काही तासांआधी लातूरच्या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं
गेल्या दोन वर्षांपासून NEET ची तयारी केली, परीक्षेच्या आदल्या दिवशीच लातूरच्या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं

Latur News: NEET परीक्षेच्या एक दिवस आधी लातूर शहरातील एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी उद्या (4 मे) होणाऱ्या नीट परीक्षेच्या एक दिवस आधीच एका विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षांपासून लातूरच्या एका प्रसिद्ध कोचिंगमध्ये तो नीट परीक्षेची तयारी करत होता. (Latur NEET Student Sucide)
अनिकेत अंकुश कानगुडे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवाशी होता.
नक्की घडलं काय?
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा उद्या होणार आहे. मात्र लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या नीट परीक्षेत अनिकेतला सुमारे 520 गुण मिळाले होते. मात्र या गुणांमुळे त्याला मेडिकलला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा मेहनत करून यंदा नीट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परीक्षेच्या अवघ्या एका दिवस आधी त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि राहत्या खोलीत गळफास घेत आपले जीवन संपवले. अनिकेतची आत्महत्या ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर शिक्षक, मित्र आणि संपूर्ण शैक्षणिक वर्तुळासाठी धक्कादायक ठरली आहे. मुलगा वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावा, अशी त्याच्या कुटुंबाची अपेक्षा होती. त्यामुळे घरच्यांनी त्याला लातूरमध्ये राहून अभ्यासासाठी पाठवले होते.
पंचनामा सुरु, परिसरात खळबळ
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. विद्यार्थ्यांवर होणारा अभ्यासाचा ताण आणि स्पर्धेचा दबाव यामुळे अशा घटना घडत आहेत का, याबाबतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर हे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील नीट, सीईटीसाठी कोचिंग हब आहे.
हेही वाचा:






















