Latur : लातुरात बनावट NA लेआउट देणारी टोळी सक्रिय; माहिती अधिकारातून धक्कादायक प्रकार उघड
Latur News Updates: लातूरमध्ये ही कागदपत्र बनावट पद्धतीने तयार करून देणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. माहिती अधिकारातून पाच प्रकरण उजेडात आली आहेत.
Latur News Updates: व्यापारी पेठ आणि एज्युकेशन हब अशी ओळख असलेल्या लातूरमध्ये दिवसेंदिवस जमिनी आणि प्लॉटचे भाव गगनाला भिडले आहेत. लातूर येथील रजिस्ट्री ऑफिसमध्ये दररोज लाखोचे व्यवहार होत असतात. कोणत्याही प्लॉटची रजिस्ट्री करताना एनए अर्थात अकृषी परवानगी आणि अंतिम रेखांकन म्हणजे फायनल लेआउट तसेच गुंठेवारी परवानगी आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी महसूल विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च होतो. याला एका टोळीने भक्कम पर्याय पुढे आणला आहे. लातूरमध्ये ही कागदपत्र बनावट पद्धतीने तयार करून देणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. माहिती अधिकारातून पाच प्रकरण उजेडात आली आहेत. यापूर्वीही अशीच प्रकरणे उजेडात आल्यानंतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. रजिस्ट्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली.
लातूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना लगतच्या अनेक शेत जमिनीवर प्लॉटिंगच्या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. या ठिकाणी प्लॉट विकताना कागदपत्रे आवश्यक असतात. सर्व नियमांची पूर्तता होत असेल तर खरेदीखत केली जातात अन्यथा नाही. एनए करून घेताना शासनास मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो. यातून पळवाट काढण्यासाठी चक्क बनावट एनए ची कागदपत्रे तयार केली जात आहेत. यासाठी खोटी माहिती, बनावट शिक्के आणि अधिकाऱ्याच्या खोट्या स्वाक्षरी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांतून पाच ठिकाणी असलेले साडे आठ हजार चौरस मीटर जागेचे बनावट एन ए करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
एन ए ची कागदपत्र बोगस पद्धतीने तयार करून देणारी टोळी कार्यरत
लातूर शहर आणि परिसरात जमिनीच्या व्यवहाराला मोल आले आहे, पण असे व्यवहार करत असताना जमिनीचे एन ए आवश्यक असतात. ही बाब लक्षात घेवून शहरात सक्रिय असणाऱ्या टोळीने शासनाच्या नगररचना, महसूल विभाग व नागरिकांची फसवणूक करून कागदपत्रात खाडाखोड करून बनावट एनए प्रमाणपत्र तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे, अशी फसवणूक करणाऱ्या या टोळीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. कागदपत्राची तपासणी सुरू आहे, यात काही गैरकृत्य आढलून आल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी डी जी माईनकर यांनी दिली आहे
यावर्षी 12 जुलैला एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्या परिपत्रकानुसार एनए लेआउट असेल तरच रजिस्ट्री करता येईल अन्यथा नाही असा नियम होता. त्यामुळे रजिस्ट्री ऑफिसमध्ये रजिस्ट्री करणाऱ्यांचा ओघ कमी झाला. त्यातून मग बनावट एनए देणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली. बनावट एनए करून देणारे हे लोक आमच्यासारख्यांना डोकेदुखी ठरत असल्याची तक्रार रजिस्ट्री ऑफिस येथे कामानिमित्त आलेल्या रिअल इस्टेट एजंट रामेश्वर धुमाळ यांनी केली आहे
शासनाचा कर बुडवणे, खोटी कागदपत्र तयार करून ग्राहकांना फसवणे, असे प्रकार सर्रास चालू असल्यामुळे प्लॉट खरेदी करणाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. यावर वेळीच पायबंद होणे आवश्यक आहे, असं माहिती अधिकार कार्यकर्ते मलिकार्जुन भाईकट्टी यांनी सांगितलं. या प्रकरणाची भाईकट्टी यांनी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ही बातमी देखील वाचा-