Latur Heavy Rains : लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, 19 जनावरांचा मृत्यू, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
लातूर जिल्ह्यात वीज पडून आणि पाण्यात वाहून जाऊन 19 जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. काल दुपारी लातूर शहर, लातूर ग्रामीणमधील जळकोट, निलंगा, औराद शहजानी, देवनी, अहमदपुर, चाकूर या तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
लातूर : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात वीज पडून आणि पाण्यात वाहून जाऊन 19 जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. काल दुपारी लातूर शहर, लातूर ग्रामीणमधील जळकोट, निलंगा, औराद शहजानी, देवनी, अहमदपुर, चाकूर या तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान केलं आहे. औराद शाहजनी, उस्तूरी, कासार बालकुंदा भागात वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. निलंगा भागातही तीच स्थिती होती. कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. यामध्ये सात जनावरे वाहून गेली आहेत. जळकोट तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे या भागातील आंबा फळबागेला फटका बसला आहे.
भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे बाजारात भाजीपाल्यास आगोदरच उठाव नाही. त्यात ह्या पावसाने शेतकरी कोलमडून पडला आहे. जळकोट येथील पाटोदा गावात झाड पडल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. देवनी भागात सारोला, बोराळ या ठिकाणी काही घरचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत तसेच अनेक झाडंही कोसळली आहेत.
अहमदपुर अतनुर आणि नळेगाव भागात ही पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जनावरांसाठी साठवलेला वर्षभराचा चारा ह्या पावसात नष्ट झाला आहे. काही ठिकाणी ठेवलेला चारा वाऱ्यामुळे उडून गेला आहे तसेच पावसाने भिजून खराब झाला आहे.
कोरोना संसर्गामुळे शेतमालाला उठाव नाही. यामुळे खालावलेल्या आर्थिक स्थितीत हे नवीन संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळ्यात या भागात झालेल्या तूफान पावसात येथील जमीनी खरवडून गेल्या होत्या. सगळी पीके वाहून गेली होती. त्यातून आता कुठे शेतकरी सावरत होता, मात्र ह्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे आर्थिक गणित चुकवले आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.