Lata Mangeshkwar Passes Away : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Lata Mangeshkwar Passes Away : लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
Lata Mangeshkwar Passes Away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि सहा फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
The state government has declared a public holiday in the state on Monday, February 7, 2022, to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. महापालिका थोड्या वेळात शिवाजी पार्कात स्टेज उभारणार आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे.