पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद
कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम शिवाजी पाटील आज पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आलं आहे.
कोल्हापूर : भारतमातेने आज (21 नोव्हेंबर) पाकिस्तानच्या हल्ल्यात आपला आणखी एक सुपूत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा याठिकाणचे संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलं. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं.
मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
गेल्याच आठवड्यात म्हणजे भाऊबीज दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथल्या शहिद ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे एक जवान ऐन दिवाळीत आणि दुसरा जवान दिवाळी संपताच शहीद झाला आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या दोन सुपूत्रांना सीमेवर वीरमरण आलं आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट आहे. आणखी किती सुपूत्र आपण गमावायचे? आणखी किती शहीदांना मानवंदना द्यावी लागणार आहे? असा सवाल देखील करण्यात येत आहे.