Top Headlines Today : जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
धर्मवीर चित्रपट आज सिनेमागृहात होणार प्रदर्शीत
धर्मवीर चित्रपट आज प्रदर्शीत होणार. या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळू शकते. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानपर्यंत अनेक दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून उपस्थितीत होते.
महागाईचा भस्मासुर सर्वसामान्यांना गिळतोय, 8 वर्षातील सर्वात जास्त महागाई
एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी समोर आलीय. एप्रिलमध्ये महागाई दर 7.79 टक्क्यांवर. मार्चमध्ये महागाईचा दर होता. 6.95 टक्के. तर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये महागाईदर होता 4.23 टक्के. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर (आरबीआय) व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये फूड इन्फ्लेशनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य महागाई दर 8.38 टक्क्यांवर पोहोचलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात नागरिकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.
अनिल देशमुखांची शस्त्रक्रिया सरकारी की खासगी दवाखाण्यात? न्यायालयाचा आज निकाल
अनिल देशमुखांची शस्त्रक्रिया कुठे होणार ? सरकारी की खासगी दवाखाण्यात? न्यायालयाचा आज निकाल. जेजे रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आपले वाढते वय पाहता आपल्याला सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली. मात्र ईडीनं याला विरोध केला असून देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केलाय. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीचा दावा आहे. अनिल देशमुख मात्र खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यावर ठाम आहेत. त्याचा निकाल आज येणार आहे.
संभाजीराजे स्वराज्य संघटना स्थापन करणार, कोणाला देणार पाठिंबा ?
संभाजीराजेंच्या संघटनेंची भुमिका काय असणार? पाठिंबा कोणाला ? महाविकास आघाडीला की महायुतीला ? खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज स्वराज्य नावाची संघटना स्थापन करताना राजकरणात उतरल्याशिवाय सर्वसामान्य जनेतच्या अडचणी सोडवता येणारं नाहीत. याचवेळी त्यांनी आपण अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणुक लढण्याचं जाहीर केल आहे. मात्र दुसरीकडे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांबाबत संभाजीराजे कोणती भुमिका घेणार? संभाजीराजे यांची संघटना कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार ? हे पाहावं लागणार आहे.
नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
देशातून अनेक विद्यार्थ्यांनी 21 मे रोजी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आयएमए ने सुद्धा यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र लिहिले आहे. नीट पीजी 2021 काऊन्सेलिंग राउंड अद्याप अनेक राज्यात पूर्ण झाले नाहीत त्यामुळे यामध्ये कौन्सिसिंग राउंडस आणि परीक्षा यात फार अंतर नाही. शिवाय कोव्हीड ड्युटी मुळे परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही त्यामुळे किमान दहा आठवडे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली गेली आहे यासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुद्धा होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका फेटाळून लावली
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, 'आम्ही इथे कोणत्या विषयावर संशोधन व्हायला हवं की करू नये, यासाठी बसलो नाही आहोत'. यासोबतच लखनौ खंडपीठानं म्हटलं की, हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर आहे आणि ते इतिहासकारांवर सोडलं पाहिजे.
बंगळुरूसमोर पंजाबचे आवाहन, रंगणार चुरशीचा सामना
IPL 2022 मध्ये शुक्रवारचा सामना मोठा आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. बेंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदार बनला आहे. पण पंजाबच्या (पीबीकेएस) आशाही अबाधित आहेत. आणि त्याच आशेला पंख देण्यासाठी पंजाब बंगळुरूविरुद्ध (आरसीबी) विजयाचा गजर करताना दिसतो. पंजाबने हा सामना जिंकल्यास बंगळुरूचे गणित थोडेसे विस्कळीत होईल आणि बंगळुरूने विजय मिळवला तर त्याचे प्लेऑफचे चित्र अधिक स्पष्ट होईल. दोन्ही संघांमधील हा महत्त्वाचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.