Nagpur Crime: कुख्यात अक्कू यादवच्या सामूहिक हत्येत नक्षलवाद्यांची प्रेरणा; नक्षलवाद्यांच्या पत्रकात धक्कादायक खुलासा
अक्कू यादवची हत्या करणाऱ्या महिलांना नक्षली नेते मिलिंद तेलतुंबडेची प्रेरणा होती. होणाऱ्या अत्याचार विरोधात पेटून उठावे, या आवाहनावर ही घटना घडली होती असा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.
Nagpur: नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात (Nagpur District and Sessions Court) 2004 मध्ये झालेल्या अक्कू यादव (Akku Yadav) या कुख्यात गुंडाच्या खळबळजनक सामूहिक हत्या प्रकरणाच्या मागे नक्षलवाद्यांची (Naxalite) प्रेरणा होती. हे खुद्द नक्षलवाद्यांनीच एका पत्रकाच्या माध्यमातून मान्य केले आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा वरिष्ठ सदस्य आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचा सचिव मिलिंद तेलतुंबडेच्या पोलीस एन्काऊंटर (Police Encounter) मधील मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले. नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीतील (Gadchiroli) मर्दिनटोलाच्या जंगलात 13 नोव्हेंबर 2021 रोजी पोलीस एन्काऊंटर मध्ये मारल्या गेलेल्या सर्व 27 नक्षलवाद्यांना एका पत्रकाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 65 पानांच्या या पत्रकामध्ये नक्षलवाद्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
त्यामध्ये 2004 मध्ये नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जमावाकडून झालेल्या अक्कू यादव या कुख्यात गुंडाच्या सामूहिक हत्या प्रकरणाच्या मागे नक्षलवाद्यांची प्रेरणा होती असे या पत्रकात मान्य करण्यात आले आहे. अक्कू यादवची हत्या करणाऱ्या महिलांना नक्षली नेते मिलिंद तेलतुंबडेची प्रेरणा होती. महिलांनी त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचार विरोधात पेटून उठावे, या मिलिंद तेलतुंबडे याच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊनच ही घटना घडली होती असा दावा या पत्रकात करण्यात आला आहे. अक्कू यादव या कुख्यात गुंडाची कोर्टाच्या आवारात महिलांनी सामूहिक हत्या केली होती. अक्कू यादवविरोधात गंभीर गुन्हे दाखल होते.
एवढेच नाही तर 1998 मध्ये मुंबईतील (Mumbai) घाटकोपर येथील रमाबाई नगर परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तसेच 2006 मध्ये झालेल्या खैरलांजीच्यादुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक तणावामागेही नक्षलवाद्यांनी कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडेच्या नेतृत्वात हिंसेला प्रोत्साहन देण्याचे काम केले होते हेही या पत्रकात मान्य करण्यात आले आहे.
अक्कू यादव हत्या प्रकरण असो किंवा महाराष्ट्रात घडलेल्या काही हिंसक आंदोलन असो. पोलिसांच्या तपासात आधीच यामागे नक्षलवादी असल्याचे समोर आले होते. मात्र, आता खुद्द नक्षलींनी ते मान्य करत पोलिसांचा तपास आणि माहिती खरी होती, असा दुजोराच नक्षलवाद्यांनी त्यांच्या पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
नक्षलींकडून संघर्ष कायम
सुरक्षा बल आणि नक्षलींमधील संघर्षाच्या घटना नक्षल प्रभावी क्षेत्रात कायम असून जानेवारीमध्येही गडचिरोलीत नगरपंचायत निवडणुकांनंतर नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले होते. त्यांनी वाहनांची जाळपोळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
ही बातमी देखील वाचा