(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kharghar Heat Stroke : खारघर घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती, एका महिन्यात अहवाल सादर होणार
Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई: खारघर येथे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यानंतर (Maharashtra Bhushan Award) झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारने समिती नेमण्याची घोषणा केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही एकसदस्यीय समिती नेमण्यात येणार असून एका महिन्याच्या कालावधीत याचा अहवाल सादर होणार आहे. खारगर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता.
खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं होतं. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकिय यंत्रणा राबविण्यात आली, मात्र त्याचा खर्च दाखवण्यात आला नाही याची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
खारघर घटनेची चौकशी करण्याची विरोधी पक्षाकडून सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने आता समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2023
14 पैकी 12 जण उपाशी
खारघर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हतं, असं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला होता. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं.
खारघर मृतांची ओळख पटली
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटली असून त्यांची नावं पुढीलप्रमाणे,
1) तुळशिराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिध्दराम वायचाळ
5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर
14) स्वाती राहुल वैद्य
ही बातमी वाचा: