विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षेचा नवा पॅटर्न: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सर्व परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. काटेकोर नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा या विद्यापीठाने उमटवला आहे.
जळगाव: एकीकडे महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यापीठात अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक व्यत्यय उदभवल्यामुळे ठरलेल्या दिवशीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या किंवा त्या पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. असे असतांना जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरळीत सुरु आहेत.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी दुर्गम व आदिवासी भागात राहणारे असल्यामुळे ऑनलाईन परीक्षेत नेटवर्कचा प्रश्न निर्माण होईल अशा शंका उपस्थित होत होत्या. परंतु विद्यापीठाने भौगोलिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता यांचे योग्य ते आकलन करुन सुरुवातीपासूनच बारकाईने नियोजन केले आणि इतर विद्यापीठांमध्ये तांत्रिक व्यत्यय निर्माण होत असतांना या विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरू करून आपला वेगळा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पॅटर्न निर्माण केला आहे.
251 विषय आणि 2238 प्रश्नसंच असलेल्या या परीक्षांची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांवर न सोपविता स्वत: घेतली. या परीक्षेसाठी ऑनलाईनचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 39,090 व ऑफलाईनचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14,474 अशी आहे.
प्रत्यक्ष परीक्षांना १२ ऑक्टोबरला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी काही किरकोळ अपवाद वगळता परीक्षा सुरळीत झाल्या. या यशाचे नेमके गमक कुलगरु प्रा.पी.पी.पाटील यांची ओटीपी नको, विद्यार्थी थेट लॉगइन होईल ही आग्रही भूमिका कामी आली. ऐनवेळी तांत्रिक अडचण उदभवण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठ प्रशाळांमध्ये 334 आयटी समन्वयकांची नियुक्ती केली. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी काही अनुभवी प्राध्यापकांचा समावेश असलेल्या वॉररुमची निर्मीती करण्यात आली. ऑनलाईन परीक्षा देतांना विंडो कालावधी तीन तासांचा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना लॉगीन काही अडचणी आल्या नाहीत.
कशी केली पूर्व तयारी? कोरोनामुळे परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतांना परीक्षा घेण्याची वेळ आलीच तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांव्दारे परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने आधीच नियोजन केले होते. त्यानंतर सर्व अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, प्राचार्य यांच्यात अनेक बैठका झाल्या. परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय ठेवले. ज्या महाविद्यालयात एखाद्या विद्याशाखेच्या प्राध्यापकांचे मनुष्यबळ अधिक असेल त्या ठिकाणी प्राचार्यांना पेपर सेटींग करुन घेण्याची जबाबदारी देण्यात आली. पेपर सेटींगची सॉफ्ट कॉपी ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या अनुभवी कंपनीला वेळेच्या आत दिली गेली. त्या कंपनी कडून त्याचे सादरीकरण करून घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरुप कळावे यासाठी बहुतांश विद्याशाखांचे नमुना प्रश्न विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आले. ऑफलाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या छपाईचे काम अन्य मुद्रकाकडे दिल्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन अशी कामांची विभागणी झाली आणि वेळेची बचत आणि अचुकता साधता आली. परीक्षेची तयारी पूर्ण होत असल्याचे लक्षात येताच वेळापत्रकही जाहीर केले गेले.
परीक्षेच्या वेळी लॉगीन कसे व्हावे याची तांत्रिक माहिती व्हावी यासाठी सप्टेंबर महिन्यापासून सराव चाचण्या घेण्यात आल्या. यात 35 हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. परीक्षेच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. तसेच ऑनलाईन परीक्षेची माहिती देणारी मार्गदर्शक पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. शाखानिहाय टेलिग्राम ग्रुप स्थापन केल्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या शंकांचे निरसन या ग्रुपवरच केले गेले.
कुलगुरुंच्या दालनातील संगणकावर डॅशबोर्डचे लॉगीन घेतल्यामुळे परीक्षेला त्या त्या सत्रात किती विद्यार्थी लॉगीन झाले आणि किती प्रतिक्षेत आहेत याची माहिती मिळत गेली. प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून आली तर तातडीने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याना दूरध्वनीव्दारे संपर्क साधून संदेश दिला गेला. कुलगुरु पूर्णकाळ त्यावर नियंत्रण ठेवून आहेत. परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष येणे शक्य नव्हते अशा एका दिव्यांग विद्यार्थिनीला घरपोच पेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली.
यासंबंधी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व जळगावचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्र्यांनी केलेल्या उपयुक्त सुचना आमलात आणल्या. ऑफलाईन परीक्षेच्या नियोजनासाठी तिनही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे स्वत: कुलगुरुंसोबत ऑफलाईन परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी गेले.
विद्यापीठाच्या या सुरळीत होत असलेल्या परीक्षांसाठी विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळे, अधिष्ठाता तसेच प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी, वॉर रुममधील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आयटी समन्वयक, संस्थाचालक यांचे सहकार्य लाभत आहे.