Kartiki Ekadashi 2021 : उद्या कार्तिकी एकादशीचा सोहळा, नियमांचं पालन करत यंदा यात्रा; तयारी पूर्ण
Kartiki Ekadashi 2021 : कोरोनाचं सावट आल्यानंतर पंढरीचे वारकारी काही वाऱ्यांपासून वंचित राहिले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं यंदा कार्तिकीचा सोहळा पार पडणार आहे.
Kartiki Ekadashi 2021 : कोरोनाचं सावट आल्यानंतर पंढरीचे वारकारी काही वाऱ्यांपासून वंचित राहिले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं यंदा कार्तिकीचा सोहळा पार पडणार आहे. लॉकडाऊननंतर पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi 2021) यांवरही निर्बंध लादण्यात आले होते. पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून उद्या 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्या दृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.
कार्तिकीबाबत प्रशासनाने सर्व तयारी जोरात सुरु केली असून यंदा आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता पाहून दर्शन रांग आणि इतर तयारी सुरु केली आहे. गोपाळपूर येथे दर्शन रांगेत 10 पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या कडेनं दर्शन रांग गोपालपूरपर्यंत उभारण्यात आलेली आहे. कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. यात्रेसाठी येणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याशिवाय मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी हजर राहणाऱ्या सर्वांची RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या 65 एकर भागाची सफाई पूर्ण झाली आहे. येथील 350 प्लॉटचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. एकंदर अजूनही शासनानं कार्तिकीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी प्रशासनानं मात्र कार्तिकी होणार असल्याचं नोटिफिकेशन काढल्यानं यंदा कार्तिकी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार ही वारकरी संप्रदायाला प्रशासनाकडून खास दिवाळी भेट ठरणार आहे.
कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आता देवाचे राजोपचार बंद, 24 तास दर्शन व्यवस्था सुरु
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. सहा तारखेला धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्यानं कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
65 वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन
आता 65 वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. प्रशासनानं कोरोना काळातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात गर्भवती महिलांनाही दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानं वारकऱ्यांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.कोरोनाच्या संकटानंतर होत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरवण्यास परवानगी देताना 65 वर्षांपुढील वारकरी, गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे.