पर्यटकांना गोकाक धबधबा जवळून न्याहाळता येणार, धबधब्यावर काचेच्या पुलाची निर्मिती होणार!
बेळगावमधील गोकाक धबधबा हा कर्नाटकचा नायगरा म्हणून प्रसिद्ध आहे. आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच या धबधब्याजवळ काचेचा पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना जवळून गोकाक धबधबा न्याहाळता येणार आहे.
बेळगाव : कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे.
हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या विकास कामांतर्गत गोकाकच्या धाबधब्याजवळ केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेच्या पॅटर्नवर आधारित काचेच्या ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे 350 कोटी रुपयांच्या खर्चातून या क्षेत्राचा विकास करण्याची योजना जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या कामकाजाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
गोकाक धबधब्यावर काचेचा ब्रीज, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि मोठ्या प्रमाणात पाणी साठवून हरिद्वारच्या धर्तीवर गंगा पूजन व्यवस्था करण्याची योजना आहे. काचेच्या ब्रीजमुळे गोकाक धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धबधबा जवळून न्याहाळण्याची संधी मिळणार आहे.
बेळगावमधील गोकाक धबधबा हा कर्नाटकचा नायगरा म्हणून प्रसिद्ध आहे. घटप्रभा नदीवरील हा धबधबा देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आता आणखी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथे काचेचा पूल बांधण्याची तयारी सुरु आहे. या भव्य धबधब्यावरील काचेच्या पारदर्शी पुलावरुन चालताना वेगाने कोसळणारं पाणी पाहणं हा पर्यटकांसाठी अद्भूत अनुभूव ठरेल.
महत्त्वाचं म्हणजे या धबधब्यावर झुलता पूलही बांधण्यात आला आहे. हा पूलही पर्यटकांना आकर्षित करत होता. परंतु 2019 मध्ये आलेल्या पुरामुळे पुलाचं फार नुकसान झालं. त्यामुळे तो पूल पर्यटकांसाठी बंद करण्यात आला.