दम असेल रणजित निंबाळकरांनी समोर येऊन आरोप करावेत, जयश्री आगवणेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, चेल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने आता नवनवीन आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत.
Jayashree Agawane on Ranjit Nimbalkar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने आता नवनवीन आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत. दरम्यान जयश्री आगवणे या दिगंबर आगवणे यांच्या पत्नीच नसल्याचा दावा फलटणमधील माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला होता. दरम्यान, आता त्यांच्या या आरोपांना जयश्री आगवणे यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पर्याय नसल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायेत
पंधरा वर्षांपूर्वी दिगंबर आगवणे यांच्या बरोबर रीतसर लग्न करून मी नांदत आहे. रणजीतसिंह निंबाळकरांवर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आता पर्याय नसल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप आता जयश्री आगवणे यांनी केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी समोर येऊन आरोप करावेत, आपल्या चेल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता? असा सवाल जयश्री आगवणे यांनी केला आहे. ज्यावेळी तुमची पत्नी निवडणुकीला उभी होती, ज्यावेळेस तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात, त्यावेळेस तुम्हाला दिगंबर आगवणे चालले, जयश्री आगवणे चालल्या. मात्र आज तुमच्या कटकारस्थानांना समोर आणताच तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवता काय? असा सवाल आता जयश्री आगवणे यांनी केला आहे.
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. याबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही यामुळे चर्चेत आले आहेत. वर्षा आणि हर्षा आगवणे या जुळ्या बहिणींच्या सुसाइड नोटमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कथित दबावाचा उल्लेख करण्यात आला होता असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं. तसेच सुषमा अंधारे यांनी निंबाळकर आणि जयश्री आगवणे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती.
जयश्री आगवणे यांनी निंबाळकर यांच्यावर केला मोठा आरोप
या नंतर जयश्री आगवणे यांनी निंबाळकर यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ही ऑडिओ क्लिप 2023 ची आहे. माझ्या पतीला अटक करण्यात अली होती. माझे सासरे मारणाच्या दाढेत होते. रणजितसिह निंबाळकर हे पतीच्या खूप जवळचे होते. मी रणजित दादांना फोन केला की हे मिटवा आणि सोडा. ते म्हणाले मला पण मिटवायचं आहे. पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा. रामराजे निंबाळकर यांचे नाव व्हिडिओमध्ये घ्या आणि 50 लाख रुपये केसेस साठी दिले असा सांगा, असा आरोप आगवणे यांनी केला होता. आमचा तसा संबंध रामाराजे यांच्याशी नव्हता. रणजितसिह निंबाळकर यांच्याशी माझ्या पतीचे आर्थिक व्यवहार होते. माझ्या विरोधात गेला म्हणून आमचा कुटूंबाचा वापर रणजितसिह निंबाळकर यांनी केला. आमचे आता घर नाही राहिल. तीन मुले तीन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहे. बेघर आम्ही झालो आहोत. 2022 साली मुलींनी आत्महत्या केली, कारण त्यांना आधार राहिला नाही. पोलीस गाडी घरी यायची. दबाव टाकला जात होता. जे कोणी माझ्या पतीला मदत करेल त्याला सुद्धा खोट्या केसेस मध्ये टाकल्या जायच्या असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
Phaltan Doctor Death: सुषमा अंधारेंचा सनसनाटी आरोप, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा, म्हणाले, पुढच्या 48 तासांत....
























