(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला असं नाही आहे. मात्र येत्या तीन-चार महिन्यांत हा दर्जा पुन्हा मिळवू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा (NCP) दर्जा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला असं नाही आहे. मात्र येत्या तीन-चार महिन्यांत हा दर्जा पुन्हा मिळवू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
वेगवेगळ्या राज्यात मतं घेण्यात काही कमतरता आली असेल. पण येणाऱ्या निवडणूकांमधे हा दर्जा पुन्हा मिळेल. कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमधे आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू असं मला वाटतं. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे. येत्या तीन- चार महिन्यांत हा दर्जा पून्हा मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काही पक्षांची काही काळासाठी क्रेझ असते. आम आदमी पार्टीने अनेक आश्वासनं दिली आणि पक्ष वाढवला. आम्ही मात्र शक्य तेवढीच आश्वासने देतो. लोकांच्या पैशांवर आश्वासने देणे, असं आम्ही करत नाही. आपने पंजाबमधे जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण होतायत का?, हे बघितलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही. भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल. अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही. फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवारांनी ते वक्तव्य केलं आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकार हे किती काम करत आहे हे दिसत आहे. अवकाळी पाऊस पडला मात्र अजूनही पंचनामे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्येच्या दौऱ्यावरदेखील त्यांनी टीका केली आहे. आयोध्येला जाऊन काही होणार नाही. यांना सुबुद्धी देवो यासाठी आम्ही काही प्रमुख नेते विठ्ठलाला साकडे घालणार आहोत. त्यासेबतच मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार जर अपात्र ठरले तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. यामधे राष्ट्रवादीची भुमिका असण्याचा प्रश्नच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि बाबरीमशीदीचा ढाचा पडण्याच्या घटनेला खूप वर्ष झाली आहेत, असंही ते म्हणाले.