(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : 'मॅडम तुम्ही जाऊ नका'... वर्गशिक्षिकेच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांचा अश्रूंचा बांध फुटला!
Jalgaon ZP Teacher News : वर्गशिक्षिकेची बदली झाल्याची माहिती मिळताच मुलांचा अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव जिल्हापरिषदेच्या शाळेत पाहायला मिळाले.
Jalgaon Teacher News : शिक्षक कसा असावा तर तो आदर्श विद्यार्थी घडवणारा असावा आणि विद्यार्थ्यांना जीव लावून शिकवणारा असावा. तर विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची गोडी लागते. त्यातून विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला एक वेगळी उंची प्राप्त होते. असंच एक उदाहरण जळगावमध्ये समोर आलं आहे. आपल्या वर्गशिक्षिकेची बदली झाल्याची माहिती मिळताच मुलांसह शिक्षिकेचा अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य जळगाव जिल्ह्यातील भडगाव (Jalgaon Bhadgaon) तालुक्यात गोंडगाव जिल्हापरिषदेच्या शाळेत पाहायला मिळाले. या घटनेची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील निखळ प्रेम कसं असावं याचा प्रत्यय या निमित्ताने दिसून आला.
कोरोनामुळे दोन वर्षात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठं अंतर निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळांची तर दैनाच झाली म्हणायला हरकत नाही. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीव लावला की मुलंही किती प्रेम करतात याचा प्रत्यय गोंडगाव (ता.भडगाव) येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षिका संगीता पाटील यांच्या बदलीनंतर आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी अक्षरश: त्यांना गराडा घालून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी संगीता पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
गेल्या तीन वर्ष पासून गोंडगाव (ता.भडगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका संगीता पाटील यांची नियमाप्रमाणे पदोन्नती झाल्याने उपखेड (ता.चाळीसगाव) येथे बदली झाली आहे. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिक्षिकेची बदली झाल्याचे समजल्यावर मात्र विद्यार्थिनींना काय करावे सुचत नव्हते. विद्यार्थ्यांनी संगीता पाटील यांना गराडा घालत रडायला सुरवात केली. "मॅडम तुम्ही जाऊ नका" अशी आर्त हाक देत विद्यार्थी रडू लागले. यावेळी या मुलांची समजूत कशी घालायची असा प्रश्न संगीता पाटील यांच्यासह उपस्थित शिक्षकांना पडला होता.
या विद्यार्थ्यांना आपणच जीव लावला असे नव्हे तर त्यांनीही आपल्यावर तेवढंच प्रेम केले असल्याने आपल्याला ही अश्रू अवरणे कठीण जात आहे, असं संगीता पाटील यांनी म्हटलं. गेल्या दोन दिवसांपासून तहान भूक झोप सगळंच विसरल्यासारखं झालं आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्याला लावलेलं प्रेम आपण कधीच विसरू शकणार नाही अशा प्रकारची भावनाही संगीता पाटील यांनी व्यक्त केली.