माझ्या वक्तव्याचा विपर्यास, चुकीचा अर्थ काढून शिवसेनेनं केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीका करत आंदोलन केलं.

मुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी केलेल्या आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं (Shivsena) त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचंही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील (Jalgaon) एका कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी वक्तव्य केल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाहीत, हातपाय बघणारे कधीच स्त्रीरोगतज्ञ होऊ शकत नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या (Shivsena) वतीने सोमवारी जळगाव महापालिकेसमोर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिमा जाळण्यात आले. तसेच प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
गुलाबराव पाटील यांनी आता यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. आंदोलन करणं हास्यास्पद आहे. चुकीचा अर्थ काढून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आल्याचं मंत्री पाटील म्हणाले.
याबाबत ज्या वृत्त वाहिनीने प्रसारित केले, त्या वृत्तवाहिनीवर हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. मी कोणा डॉक्टरबाबत बोललो नाही. वृत्तवहिनीने तपासून बातम्या केल्या पाहिजेत, जेणेकरून कोणाचे करीअर बरबाद होणार नाही अशी खंतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
आजही एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आम्ही 50 खोके एकदम ओके आहोत असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व बाजूने आमच्यावर टीका होत आहे. आमची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे मी सहजच 50 खोके तर खोके असं बोललो असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावेळी आम्ही मतदान केलं होत तर त्यावेळी आम्ही पैसे घेतले होते का असा सवालही मंत्री पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही केवळ मतदान केलं, तरीही आमच्यावर आरोप करत करत असाल तर मी बोललो पन्नास खोके तर खोके. मात्र याचा दुसरा अर्थ काढण्यात आल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
























