नदीच्या तळाशी जाऊन गणपती बाप्पाला अनोख्या पद्धतीनं निरोप, जळगावच्या तरुणाची होतेय सर्वत्र चर्चा
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरुणाने अनोख्या पद्धतीनं गणेश विसर्जन केलं आहे. या विसर्जनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Jalgaon Ganesh Visarjan : गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) समारोप आज (शनिवार, 6 सप्टेंबर) होत आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले आहेत. जळगावमध्येही विविध ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरुणाने अनोख्या पद्धतीनं गणेश विसर्जन केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सागर खेडकर या तरुणाने डोंगरी नदीच्या तळाशी जाऊन अनोख्या पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केलं आहे. याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सागर खेडकर या गणेशभक्तने पाण्याच्या तळाशी जाऊन गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला पाण्याच्या तळाशी घेऊन जात त्याचे चित्रीकरण करुन विसर्जन केले आहे. दरवर्षी अशाच पद्धतीने सागर खेडकर हा बाप्पाला निरोप देत असतो.
तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीत विसर्जन करण्यास मनाई
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नदीपात्रात विसर्जन करण्यास मनाई करण्यात येत आहे. नगरपालिका व प्रशासनाच्या स्वयंसेवकांच्या वतीने मूर्ती संकलित करुन मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळं तापी नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. तापी नदीच्या काठावर प्रशासनाच्या वतीने बॅरिकेटिंग करून नदीपात्रात जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे.
जळगाव शहरात विविध ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुकीवर व्हिडिओ चित्रिकरणाद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. नदी परिसरात जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने विशेष विसर्जन कुंड उभारले आहेत. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचे पर्यायी व्यवस्थापन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Ganesh Visarjan 2025 : पुढच्या वर्षी लवकर या! भर पावसात नाशिककरांचा गणरायाला निरोप; पाचही मानाचे गणपती मार्गस्थ























