Jalgaon Dudh Sangh Elections Result: जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसेंसारखा पैलवान आम्ही चारी मुंड्या चीत केलाय; गुलाबराव पाटलांचा टोला
Jalgaon Dudh Sangh Elections Result: जळगाव दूध संघ निवडणुकीत एकनाथ खडसेंसारखा पैलवान आम्ही चारी मुंड्या चीत केलाय, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी टोला लगावला आहे.
Jalgaon Dudh Sangh Elections Result: जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या गडाला सुरुंग लागल्याचं पाहायला मिळालं. खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं (BJP-Shinde Group) विजय मिळवला आहे. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. यावर बोलताना जळगाव दूध संघ निवडणुकीत एकनाथ खडसेंसारखा पैलवान आम्ही चारी मुंड्या चीत केलाय, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) टोला लगावला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की, "जळगाव दूध संघ निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्यासारखा पैलवान आम्ही चारी मुंड्या चीत केला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आम्ही एकीकडे, तर दुसरीकडे विरोधात असलेले एकनाथ खडसे हे पैलवान होते. आम्ही त्यांना चारही मुंड्या चीत करत जिल्हा दूध संघाची निवडणूक आम्ही भरघोस मतांनी जिंकली आहे.", असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
"धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कबड्डी स्पर्धेचे चषक जसं माझ्या हातून वितरीत झालं, त्याचप्रमाणे आम्ही जिल्हा दूध संघाचं चषक भरघोस मतांनी जिंकलो.", असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
"मला क्रिकेटची आवड होती. आता जरी मी तुम्हाला जाडजुड दिसत असलो तरी, तरुण असताना हडकुळा असल्यानं कधी कबड्डीच्या मैदानात उतरता आलं नाही. त्यावेळची लालमातीतील आणि आजच्या मॅटवरच्या कबड्डीत फरक आहे. मात्र हा खेळ पाहून काश हम भी जवाँ होते.", असं वाटल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, "जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विजय झाला असला तरी गर्वांची भाषा करणार नाही, मात्र जनतेनं ज्या पद्धतीनं उत्कृष्ट मतदान केलं आहे, त्याप्रमाणे उत्कृष्ट काम नाही केलं तर लोक घरी बसवतात, याचा अनुभव आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं काम करुन हीच खात्री देतो.", असंही मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं आहे.
राजकारणातील कबड्डी ही कबड्डी सारखीच असते : गुलाबराव पाटील
"राजकारणातील कबड्डी ही कबड्डी सारखीच असते. या खेळात लोक निवडलेले असतात. इकडे राजकारणात स्थानिक पातळीवरही आमचे पैलवान असतात, त्याच्या भरोवशावर आमचं राजकारण चालतं. त्यामुळे ते मजबूत असले तरच आम्ही जिंकतो, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील विजय हा आजपुरता मर्यादीत नाही, त्याचा आगामी निवडणुकांमध्ये परिणाम होईल.", असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
समृध्दी महामार्गाच्या उद्धाटनावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. यावर बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "महामार्ग हे जनतेतेसाठी असतात आणि आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याची बोलण्याची जी भाषा आहे, ती मला बोलता येणार नाही, मात्र या महामार्गामुळे दळणवळणासाठी त्याची मदत होणार आहे. प्रत्येकाच्या काळात कामं झाली असतील, मात्र श्रेय घेण्यावरुन हा वाद असावा.", असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.