Jalgaon District Bank Election : खासदार रक्षा खडसेंसह माजी आमदार संतोष चौधरींचा अर्ज बाद; राजकीय क्षेत्रात खळबळ
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार रक्षा खडसेंसह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींचा अर्ज बाद केल्यानं खळबळ उडाली आहे.
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेनंतर अर्जांची छाननी करण्याचं काम सुरु आहे, या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या त्रुटींमुळे बाद झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकी पूर्वीच बाद झाल्यानं भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर रोहिणी खडसे विरूद्ध खासदार रक्षा खडसे यांच्यातील लढत होण्याची शक्यता मावळली असल्यानं आणि समोर आता प्रमुख प्रतिस्पर्धी नसल्यानं रोहिणी खडसे यांच्या समोरील प्रमुख अडथळा दूर झाला असून विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचं आता मानलं जात आहे.
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकी पूर्वीच अनेक रंगतदार गोष्टी यामध्ये दिवसागणिक समोर येत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काळात एकनाथ खडसे पालकमंत्री असताना त्यांनी सर्व पक्षीय पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती. याच पद्धतीनं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ही निवडणूक सर्व पक्षीय लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं भाजपसोबत निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानं भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र निर्माण झालं असल्याचं आता पाहायला मिळत आहे.
त्याचा परिणाम म्हणून मुक्ताई नगर मतदार संघातून खडसे विरूद्ध खडसे अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आज खासदार रक्षा खडसे यांचा जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज तांत्रिक चुकीमुळे बाद झाल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का असून राजकीय क्षेत्रात मोठा चर्चेचा विषयही बनला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यातील महिला राखीव आणि इतर मागास वर्गीयमधून दोन उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र दोन्ही अर्ज हे छाननी दरम्यान बाद झाल्यानं खासदार रक्षा खडसे यांचं जिल्हा बँक निवडणुकीमधील आव्हान संपुष्टात आल्याचं पाहायला मिळत आहे.
खासदार रक्षा खडसे यांनी सुचकामार्फत आपले उमेदवारी अर्ज भरले होते, नियमांनुसार या अर्जावर सुचकाची सही आवश्यक असणं अनिवार्य असताना एका अर्जावर ती नव्हती, तर दुसऱ्या अर्जाचा विचार केला तर कोणत्याही सहकारी संस्थेचा दोन वर्ष सदस्य असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एक वर्ष व्यवस्थापक असणं अनिवार्य असताना या तरतुदी खासदार रक्षा खडसे यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याचं समोर आल्यानं त्यांचा दुसरा ही उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचं समोर आलं आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच भुसावळ राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाल्याचं समोर आलं आहे. संतोष चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा आमदार संजय सावकारे यांनी हरकत अर्ज दाखल करताना संतोष चौधरी यांना दोन वर्षहून अधिक काळासाठी कारागृहाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली असल्याची तक्रार केली होती, ती ग्राह्य धरण्यात आल्यानं माजी आमदार संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज ही बाद झाल्यानं त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
मुक्ताईनगर सोसायटीमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही आपल्या सूचक मार्फत आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर असलेल्या दोन्ही उमेदवारांचे अर्जही तांत्रिक कारणांनी बाद झाले असल्याची महितीही सूत्रांकडून मिळाल्यानं या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचाही बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं मानलं जातं आहे. जिल्हा बँक निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी अद्याप ही सुरु असून आज सर्व अर्जांची छाननी पूर्ण करून त्याची उमेदवार पात्र अपात्र बाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अर्ज माघारी आठ नोव्हेंबरला होणार असून त्यानंतर खरी लढत कोणाकोणात होणार, हे अधिक स्पष्ट होणार आहे.