एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाहांसोबतच्या भेटीमुळे नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातल्या अनेक पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. हे इनकमिंग फक्त राजकीय क्षेत्रापुरतं न थांबता आता फिल्मी दुनियेकडेही वळतंय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातल्या अनेक पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. हे इनकमिंग फक्त राजकीय क्षेत्रापुरतं न थांबता आता फिल्मी दुनियेकडेही वळतंय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर नानांच्या भाजप प्रवेशाबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत.
सोमवारी (19 ऑगस्ट) अमित शाह यांना भेटण्यासाठी नाना पाटेकर दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहचले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. जवळपास 20 मिनिटे नाना आणि शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.
नाना पाटेकर गेल्या काही वर्षांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मग्न आहेत. पडद्याबाहेरच्या खऱ्या आयुष्यातही समाजमनावर प्रभाव टाकणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. नाम फाऊंडेशनच्या कामानं जोर घेतला तेव्हाच नाना राजकारणात येणार का? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर यांनी माध्यानांना सांगितले ही भेट सांगली, कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांसाठी होती. संस्थेला परदेशातून येणारा निधी स्वीकारण्यासाठी एफसीआरए सर्टिफिकेट मिळणं आवश्यक असतं. त्याची परवानगी मागण्यासाठी आपण शाह यांना भेटल्याचे नानांनी सांगितले.
नाना पाटेकर आणि त्यांचे नेत्यांसोबतचे संबंध हा कायमच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कधी ते राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेऊन वादात येतात, तर कधी शरद पवारांचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक करतात.
नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचं अनेकदा जाहीर कौतुक केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जे संपर्क फॉर समर्थन अभियान सुरु केलं होतं, त्यात नितीन गडकरी हे नाना पाटेकर यांना आवर्जून भेटले होते.
निवडणूक जवळ आली की, त्या त्या राज्यातल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांना पक्षात घेण्याचा पॅटर्न भाजपनं गेल्या काही वर्षात राबवला आहे. हरियाणात सपना चौधरी, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या भाजप प्रवेशाची उदाहरणं ताजी आहेत. त्यामुळेच नाना पाटेकर यांच्याबद्दलही या चर्चेनं जोर धरला आहे.
नाना पाटेकर ज्या दिवशी अमित शाह यांना भेटले, त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्रीही दिल्लीत जेटलींच्या भेटीसाठी आले होते. नंतर त्यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या या चर्चा आता कुठल्या वळणावर जाणार? हे लवकरच कळेल.
दरम्यान, नाना पाटेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी लगेच ते विधानसभा निवडणूक मात्र लढवणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीत त्यांच्या इमेजचा पक्षासाठी वापर करुन नंतर त्यांना राज्यसभेचं बक्षीस दिलं जाऊ शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement