(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरात जितके शौचालय तितक्यांनाच क्वॉरन्टाईन करता येणार, सोलापूर महापालिकेचा निर्णय
अनेक नागरिक हे होम क्वॉरंटाईन होत असल्यामुळे त्या नागरिकांवर लक्ष देता येत नाहीये. त्यांच्या माध्यमातून कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांची मदत घेऊन संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार असल्याचं सोलापूर महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.
सोलापूर : घरात जितके शौचालय असतील तितक्याच लोकांना क्वॉरन्टाईन करता येणार आहे. मात्र ज्यांच्याकडे स्वतंत्र शौचालयाची सुविधा नाही अशांसाठी पालिकेतर्फे इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ज्या नागरिकांना पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनमध्ये रहायचे नाही त्यांच्यासाठी पेड क्वॉरन्टाईनची सुविधा देखील पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने 11 खासगी हॉटेल्सना परवानगी दिली आहे.
पालिका हद्दीतील ज्या रुग्णांचे अहवान पॉझिटिव्ह आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. अशा सीसीसी केंद्रामध्ये 1200 लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनसाठी 1300 लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर(सीसीसी) मध्ये 1200 पैकी जवळपास 800 पॉझिटिव्ह पेशंट आहेत. कॉरन्टाईन सेंटर येथे हाय रिस्क कॉन्टॅक्ट 1300 लोकांपैकी फक्त 150 नागरिक आहेत. म्हणजेच बरेच नागरिक कोव्हिड बाधितांच्या संपर्कात असून देखील विलगीकरणासाठी पुढे येत नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या घरामध्ये जितके शौचालय आहेत तितकेच लोकांना घरामध्ये राहता येईल. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना राहता येणार नाही. उरलेल्या लोकांना इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनसाठी बंधनकारक आहे. तसेच झोपडपड्डीमधील नागरिकांना होम क्वॉरंटाईन ठेवता येत नाही.
अनेक नागरिक हे होम क्वॉरंटाईन होत असल्यामुळे त्या नागरिकांवर लक्ष देता येत नाहीये. त्यांच्या माध्यमातून कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांची मदत घेऊन संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनला घाबरुन जाऊ नये आणि तपासणीसाठी ही घाबरू नये. असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान या नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनची जाण्याची इच्छा नसेल त्यांच्यासाठी पेड क्वॉरन्टाईनची सुविधा देखील पालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. शहरातील 11 हॉटेल चालकांना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या-त्या हॉटेलच्या दराप्रमाणे नागरिकांना पेड क्वॉरन्टाईन होता येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरांमध्ये कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डिग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, वाडिया हॉस्पिटल या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेच्यावतीने सकाळी चहा, नाष्टा व जेवण इत्यादी देण्यात येते. मात्र या जेवणाबाबत अनेक जणांच्या तक्रारी पालिकेला प्राप्त होत होत्या. त्यामुळे संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द करुन दुसऱ्या मक्तेदाराला जेवण पुरवणाचे कंत्राट देण्यात आले आहे.
तसेच सिंहगड कोविड सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ कऱण्यात आल आहे. यापुढे नाश्तामध्ये अंडी आणि आठवड्यातून 2 वेळा मांसाहार देखील पालिकेतर्फे देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी फिल्टरच्या पिण्याची पाणी सोय करण्यात आली आहे. दरम्यान क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मनोरंजानासाठी एम रेडिओची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.