एक्स्प्लोर
Advertisement
कोपर्डी खटल्यात मराठा मोर्चाचा माझ्यावर दबाव नाही : उज्ज्वल निकम
परिस्थिती निर्जीव असली तरी बोलकी असते, त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असतात, असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.
मुंबई : मराठा मोर्चा किंवा कोणत्याही सामाजिक जन आंदोलनांचा माझ्यावर वैयक्तिकरित्या परिणाम होत नाही, त्यामुळे तो कोपर्डी खटल्यातही झाला नाही, असा दावा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि कोपर्डी खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'माझा कट्टा'वर केला. कोपर्डी बलात्कार आणि हत्या, कसाब, मुंबई बॉम्बस्फोट खटला अशा अनेक विषयांवर उज्ज्वल निकम यांनी 'माझा कट्ट्या'वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
कोपर्डी खटला पूर्णत्वास नेल्याचं समाधान उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. बलात्कार आणि हत्येचा कट रचल्याचं सिद्ध करणं आव्हानात्मक होतं. 31 साक्षीदार तपासले, उलटतपासणीवेळी खरं कसब पणाला लागलं. परिस्थिती निर्जीव असली तरी बोलकी असते, त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असतात, असं मत निकम यांनी व्यक्त केलं.
मराठा मोर्चे नसते तरी हाच निकाल
सामाजिक जन आंदोलनांचा माझ्यावर वैयक्तिक परिणाम होत नाही. मराठा समाजाचे मोर्चे शांततापूर्ण निघाले. मात्र त्यांचा माझ्या युक्तिवादावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा उज्ज्वल निकम यांनी केला. मोर्चे निघाले नसते, तरी हाच निकाल लागला असता, असं मतही निकम यांनी व्यक्त केलं.
तर कोपर्डीतील घटना टळली असती
सोशल मीडियामुळे पालकांचा मुलांशी सुसंवाद होत नाही, असंही उज्ज्वल निकमांना वाटतं. मुली छेडछाडीविषयी मनात तुंबवून ठेवतात, यामुळे आरोपींचं मनोधैर्य उंचावतं, त्यापेक्षा आई-वडील, भावंडं, शिक्षकांना सांगावं, असा सल्ला निकमांनी दिला. जर कोपर्डीतील पीडितेने आई-वडिलांना छेडछाडीची कल्पना दिली असती, तर हा प्रकार घडलाच नसता, असंही निकम म्हणाले.
कसाबच्या बिर्याणीविषयी सांगून दिशाभूल
आपल्या हातावरची राखी बघून कसाबने विचारलं, 'बादशाह, आपके हात में क्या है?' त्यावर मी रक्षाबंधानाविषयी त्याला सांगितलं. त्याच वेळी तहलानी तिथे आले. कसाब नाटकी होता. त्याने तेव्हा डोळ्यात पाणी आल्याचं नाटक केलं. ही बातमी बाहेर गेली. मी कोर्टरुम बाहेर पडताच मीडिया 'कसाब रडला का?' हा प्रश्न विचारणार, याची मला खात्री होती. गुन्हेगार रडला, तर त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण होते. मात्र त्याच्याविषयीची चीड मला कायम ठेवायची होती, म्हणून 'कसाबने मटण बिर्याणी मागितली' असं सांगून मी प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
कसाबच्या बिर्याणीच्या मागणीविषयी ऐकून, इतका निर्ढावलेला दहशतवादी बिर्याणी मागतो, त्याला जराही पश्चाताप नाही, अशी भावना लोकांमध्ये झाली. त्यामुळे कसाबच्या खयाली बिर्याणीचं सांगून मी मिसगाईड केलं, तर त्यात बिघडलं काय? असा सवालही उज्ज्वल निकमांनी विचारला.
आरोपीची केस लढवणार नाही
आजपर्यंत एकाही आरोपीची केस लढवली नाही, यापुढेही कधी आरोपीची बाजू न लढण्याचा निर्धार कायम असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले. सर्वसामान्यांचा आपल्यावर विश्वास असल्यामुळेच आरोपीचं वकीलपत्र कधी घेणार नसल्याचं निकमांनी स्पष्ट केलं.
उज्ज्वल निकम कायम सोप्या केसेस हाती घेतात, असा आरोप होतो, त्यावर निकम यांनी उत्तर दिलं. कोणतीच केस सोपी नसते, कोपर्डीची केसही सोपी नव्हती. कारण साक्षीदार कोर्टात काय बोलेल हे ब्रह्मदेवालाच ठाऊक असतं, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
गुन्हेगारांच्या मनातही माझ्याविषयी प्रेम-आदर
एखाद्याचा चेहरा, आविर्भाव आणि बोलणं पाहून मी ती व्यक्ती दोषी आहे का, हे ओळखू शकतो, असंही उज्ज्वल निकम म्हणाले. कुठे थांबावं आणि काय विचारु नये, याला साक्ष घेताना महत्त्व असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही, मी गुन्हेगारांच्या मनातही प्रेम-आदर निर्माण केला, असं उज्ज्वल निकमांनी सांगितलं.
मी पोलिसांचा म्होरक्या
पोलिस कर्मचारी पुरावे गोळा करतात, त्यामुळे पोलिस, सुरक्षारक्षक यांचं श्रेय मी कधीच नाकारत नाही. मी त्यांचा म्होरक्या आहे, असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं.
आरोपी कायदेशीर हक्कांचा वापर करुन सुप्रीम कोर्टात जातात, त्यामुळे निकाल लागण्यात दिरंगाई होते, मात्र हे टाळणं कठीण असल्याचं निकम म्हणाले. तसंच या क्षेत्रात संशोधन गरजेचं असल्याचंही निकम यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement