एक्स्प्लोर
महागाई कमी करणे ही 15 लाख रुपये देण्यामागची भूमिका : केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह
माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सिंह यांना मोदी सरकारच्या 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

पुणे : माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सिंह यांना मोदी सरकारच्या 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना सिंह म्हणाले की, "15 लाख रुपये सर्वांच्या खात्यात जमा करणार या आश्वासनामागील भूमिका लोकांनी समवजावून घेणे गरजेचे आहे. महागाई कमी झाली, डाळ, तांदूळ, गहू स्वस्त झाले, गरजेच्या वस्तूंची टंचाई भासत नाही. याचा अर्थ काय?" सिंह म्हणाले की, "राफेल व्यवहाराबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. माध्यमांमधून अर्धवट तसेच चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. राफेलवरून केवळ राजकारण सुरु आहे. राहुल गांधींच्या डोक्यात जे भरून दिले जाते तेच बाहेर येतं. काँग्रेसच्या काळात बोफोर्स घोटाळा झाला होता. तीच बाब डोक्यात ठेवून राफेलचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. राफेल हा दोन देशांमधील करार आहे. त्यामध्ये कोणताही दलाल नाही." काश्मीरप्रश्नी बोलताना सिंह म्हणाले की, "आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून पाकिस्तानसोबत चर्चेला तयार आहोत. मात्र दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी घडू शकत नाही. चर्चेसाठी आम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही. आज काश्मीरमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे. केवळ राजकारणासाठी आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जातात." दरम्यान सिंह यांनी मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "आधीच्या सरकारच्या 55 वर्षांच्या कारभारापेक्षा मोदी सरकारचा 55 महिन्यांचा कारभार गतिमान आहे. जनहिताच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेले 'अंत्योदय' हे मोदी सरकारच्या कामाचे सूत्र आहे."
आणखी वाचा























