सांगलीत पुन्हा खासदार संजय पाटील- आमदार गोपीचंद पडळकर समर्थक भिडले
मंदिरात पायात चप्पल घालून गेल्याने गावातील तरुणाने त्यांना मारहाण केली . यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता.
सांगली : मंदिरात चप्पल घालून आल्याच्या कारणावरून खासदार संजय पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. आटपाडी मधील मासाळवाडी गावामध्ये या दोन गटात जोरदार राडा झाला आहे. यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटातील तक्रारीनुसार पोलिसांनी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह मूळ आटपाडी तालुक्यातील असलेल्या पण मुंबईत आयकर सहाय्यक आयुक्त असलेल्याचा यात समावेश आहे.
सांगली आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले असून प्राणघातक हल्ला, गाडीवर हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
सोमवारी दिवाळीनिमित्त मासाळवाडीची यात्रा होती . त्याला झेडपीचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांचे कार्यकर्ते गेले होते. यावेळी काही कार्यकर्ते मंदिरात पायात चप्पल घालून गेल्याने गावातील तरुणाने त्यांना मारहाण केली . यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी बारा वाजता मासाळवाडीतील खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते विनायकराव मासाळ यांच्या राहत्या घरावर आठ ते दहा गाड्या भरून तरुणांनी तुफान दगडफेक केली. घराबाहेर असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच घरांमध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांचा दोन भाऊ आणि आई जखमी झाल्या आहेत. दगडफेक करून हे तरुण पसार झाले, याबाबत रात्री उशिरा मासाळ कुटुंबीयांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे .
निमित्त मंदिरात चप्पल घालून आल्याचे...मूळ राजकीय गटाचा वाद
रविवारी रात्रीच्या सुमारास गावातील मंदिरात दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रम होता. यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आले होते. यावेळी त्यांचापैकी काही जण हे मंदीरात चप्पल घालून आल्याने मंदिराच्या पूजाराने चप्पल बाहेर काढण्यास सांगितल्याने वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन पडळकर यांनी आपल्या समर्थकांसह गावात हल्ला चढवून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत गाड्यांची तोडफोड केल्या. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात शांताबाई मासाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मंगळवारी मासाळवाडी याठिकाणी सोमवारी रात्री झालेल्या वादाच्या रागातून गावात पडळकर आणि मासाळ गटात जोरदार हाणामारी झाली.यावेळी दोन्ही गटाकडून दगड आणि काठ्यांनी यावेळी मारामारी झाली,यावेळी असणाऱ्या दोन चार चाकी गाड्यांची ही तोडफोड करण्यात आली आहे. तर मासाळ यांच्या फिर्यादीनुसार वरून आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये आमदार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू,जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेची आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर पडळकर गटाकडूनही विरोधी मासाळ गटाविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.ज्या मध्ये सहा जणांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबई मधील आयकर सहाय्यक आयुक्त सचिन मोटे यांचा ही समावेश आहे. तर मासाळवाडी दोन गटात झालेल्या या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बारा जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे मासाळवाडी गावात तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.