नांदेडमध्ये पालकमंत्र्यांसमोर दोन आमदारांमध्ये बाचाबाची
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन ठराव घेण्याबाबत सदस्यांनी आग्रह धरला. याला पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेना सदस्यांनी जोरदार विरोध केला.
नांदेड : नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर दोन आमदारांमध्ये चांगलीच झटापट पाहायला मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन ठराव घेण्याबाबत सदस्यांनी आग्रह धरला. याला पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेना सदस्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली.
गोंधळ घालणाऱ्या सदस्यांचं निलंबन करण्यात येईल, अशी धमकी त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. बैठक संपल्यानंतर ज्यावेळी आमदार अमर राजूरकर आणि आमदार हेमंत टकले यांच्यासह शिवसेना आणि काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले. त्यानंतर एकच झटापट पाहायला मिळाली.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला आहे. सभा संपल्यावर सभागृहाबाहेर पडताना विरोधकांनी पालकमंत्र्यांसमोर प्रचंड घोषणाबाजी केली.
या गोंधळानंतर शिवसेना आणि काँग्रेस सदस्य एकमेकांसमोर आले, त्यावेळी आमदार अमर राजूरकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच झटापट झाली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोरच झाला.