कोरोना पाठोपाठ गडचिरोलीत हिवतापाचं आव्हान, राज्यातील हिवतापाचे 50 टक्के रुग्ण एकट्या गडचिरोलीत
हिवताप हा मुख्यत्वे डास चावल्यामुळे होणारा रोग किंवा आजार आहे. ऍनाफिलीस डासांच्या माद्यांमार्फत या जंतूचा संसर्ग व प्रसार होतो. हिवताप हा रोग मानवी वसाहतींच्या काळाइतका पुरातन आहे.
गडचिरोली : देशात गडचिरोली जिल्ह्याची ओळख नक्षलग्रस्त विभाग, आदिवासी समाज आणि महाराष्ट्रातील सर्वात घनदाट जंगलाने व्यापलेला प्रदेश अशी आहे. मात्र ह्या जिल्ह्यात आरोग्याची समस्याही तितकीच गंभीर आहे. कोरोनानंतर दुर्गम भागात गावांमध्ये आता हिवतापचा धोका अधिक वाढला असून राज्यातील एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ऐन पावसाळ्यात धोका अधिक वाढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर कोरोना पाठोपाठ हिवतापाचेही मोठे आवाहन उभे ठाकले आहे. सोबतच दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये पुराची मोठी समस्या उद्भवत असल्याने या भागातील गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मोठी अडचण निर्माण होत असते. आधीच विविध समस्यांनी ग्रस्त गडचिरोली जिल्हावासियांना आरोग्य यंत्रणा हिवतापाच्या विळख्यातून कसे सोडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डासांपासून धोका
हिवताप हा मुख्यत्वे डास चावल्यामुळे होणारा रोग किंवा आजार आहे. ऍनाफिलीस डासांच्या माद्यांमार्फत या जंतूचा संसर्ग व प्रसार होतो. हिवताप हा रोग मानवी वसाहतींच्या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होत असल्याने हिवताप ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे 7.5 कोटी रुग्ण व 8 लाख मृत्यू एवढे होते. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल या डासांकरिता पोषक असल्याने या भागात धोका अधिक आहे.
कसा होतो हिवताप?
प्लाझामोडियम प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने हिवताप होतो आणि त्याचा प्रसार काही विशिष्ट जातीच्या ऍनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणाऱ्या असे ऍनाफीलिसच्या सुमारे 58 जातींपैकी केवळ काही हिवतापाच्या प्रमुख प्रसारक समजल्या जातात. ग्रामीण भागात ऍनॉफीलिस क्युलेसिफेसीस व शहरी भागात ऍनाफीलिस स्टिफेन्सी हे अतिशय महत्वाचे रोगवाहक डास आहेत.
गडचिरोलीला सर्वाधिक धोका
गडचिरोली जिल्ह्यात जंगलामुळे या डासांसाठी पोषक वातावरण आहे. यामुळेच हिवतापाचे प्रमाण जास्त असल्याचे अधिकारी सांगतात. जुलै महिन्यात सर्वाधिक रूग्णवाढ होत असते. त्यामुळेच राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल 50 टक्के हिवतापाचे रुग्ण एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. यातील बहुतांश रुग्ण भमरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची या चार तालुक्यातील आहे. यावर्षी जानेवारी ते मे या महिन्यात हिवतापाचे तब्बल 1244 रुग्ण आढळले. राज्यात मागील वर्षी हिवतापाचे एकूण 12917 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 6485 रुग्ण गडचिरोली जिल्ह्यातील होते.
संख्येच्या बाबतीत बघितल्यास दरवर्षी हीच परिस्थिती असते. जंगलामुळे डासांचे प्रमाण जास्त त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्याचा बहुतांश परिसर जंगलाने व्यापला असल्याने व डासांपासून बचावासाठी पुरेशी सोयी नसल्याने हिवताप अधिक पसरतो. परिणामी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाकडून दरवर्षी हिवतापच्या निर्मूलनासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत असते मात्र आदिवासी बहुल क्षेत्रातील रुग्ण अंधश्रद्घेमुळे आधी बुवाबाजीला प्राधान्य देत असल्याने आरोग्य विभागाला उपचारसाठी काही प्रमाणात अडचण निर्माण होत असल्याचे अधिकारी सांगतात. जुलै ते ऑक्टोबर या काळात हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात.